मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न
विशेष प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल.
शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला.
सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App