Marathi publisher Arun Jakhade : प्रसिद्ध साहित्यिक तथा पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. veteran Marathi publisher Arun Jakhade Passed Away, condolences from Marathi literary world
प्रतिनिधी
पुणे : प्रसिद्ध साहित्यिक तथा पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
मराठी ग्रंथ प्रकाशनाच्या विश्वात नावलौकिक असलेले अरुण जाखडे हे एक सिद्धहस्त लेखकही होते. पद्मगंधा या प्रकाशनसंस्थेतून त्यांनी अनेक लेखकांना नावारूपाला आणले. एवढेच नाही, तर त्यांनी डॉ. गणेश देवी, रा.चिं. ढेरे, व.दि. कुलकर्णी अशा अनेक नामवंत लेखक-संशोधकांचे ग्रंथ प्रसिद्ध केले होते. विविध वर्तमानपत्रांतून 5 वर्षांहून अधिक काळ त्यांनी लेखन केले. ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ या खास साहित्यिक मेजवानी असलेल्या दिवाळी अंकांसाठीही त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळातून शोकपर प्रतिक्रिया उमटत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक धनंजय चिंचोलीकर यांनी द फोकस इंडियाशी बोलताना म्हटले की, ही बातमी खूपच धक्कादायक आहे. परवाच त्यांचा फोन झाला होता. त्यांना पायाचं दुखणं होतं हे माहिती होतं, पण त्यातून ते सावरले होते. त्यांचा प्रवासही सुरू होता. अफाट संपर्क असलेला हा माणूस. त्यांचा गोतावळ खूप मोठा होता. त्यांनी अत्यंत ताकदीची पुस्तके काढली. खासगी बैठकीत तर त्यांच्याकडे प्रचंड किस्से असायचे. आणि ते सांगण्याची शैलीही खूप रंजक होती. लेखक म्हणूनही ते ताकदवान होते. एकीकडे सदर लेखन, एकीकडे प्रकाशन, एकीकडे तीन-तीन दिवाळी अंक, असा त्यांचा प्रचंड व्याप होता. त्यांनी माझं ‘न घेतलेल्या मुलाखती’ हे पुस्तक काढलं. दरवर्षी दिवाळी अंकासाठी त्यांचा हमखास फोन यायचा. परवाच फोन झाला, आमचा विषय होता शामराव (दिवंगत श्याम देशपांडे, राजहंस प्रकाशन). मी आणि शामराव पुण्याला गेलो की कायम त्यांच्याकडे जायचो आणि ते इकडे औरंगाबादला आले की आम्ही दिवसभर सोबत असायचो. जवळपास २० वर्षांपासून आमचा संपर्क होता. फोनवर ते म्हणाले की, शाम गेल्याने आता औरंगाबादला यावेसे वाटत नाही. ही बातमी खूपच धक्कादायक आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांचेही निधन झाले. आठवड्याभरात जाखडेंच्या रूपाने दुसरा मराठी प्रकाशक निवर्तला आहे. यामुळे ही मराठी प्रकाशन व्यवसायाची मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून उमटत आहे.
veteran Marathi publisher Arun Jakhade Passed Away, condolences from Marathi literary world
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App