नाशिक : महाराष्ट्रात प्रचंड बहुमतानिशी महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर बीडच्या राजकारणाचे न्यारे वारे वाहायला लागले आणि त्या वाऱ्यांमधून पवार संस्कारित नेते एकमेकांचे कपडे फाडायला लागले. महायुतीचे फडणवीस सरकार येण्याआधी बीडच्या राजकारणामध्ये सगळे कसे “शांत – शांत” होते. म्हणजे सगळे “शांतपणे” सुरू होते. सुमडीत कोंबडी कापली जात होती, पण कुणाला कशाची भनकही लागत नव्हती. पण संतोष देशमुख प्रकरण घडले आणि बीडच्या राजकारणाचे न्यारे वारे वेगाने वाहायला लागले.
संतोष देशमुख प्रकरणात “पवार संस्कारित” वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे अडकल्याबरोबर दुसरे “पवार संस्कारित” सुरेश धस जागे झाले आणि त्यांनी कराड + मुंडे जोडगोळी विरुद्ध आरोपांची एवढी राळ उडवली की त्यात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद वाहून गेले आणि यामध्ये सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांचा “आशीर्वाद” असल्याचे बोलले गेले, पण तो “आशीर्वाद” असो अथवा नसो मुंडेंचे मंत्रीपद मात्र धस यांच्या धडाक्यामुळे उडाले ते उडालेच.
पण म्हणून धनंजय मुंडे गप्प बसले असे नाही, तर त्यांची DM गॅंग लगेच कार्यरत झाली आणि बीड जिल्ह्यातल्या “पवार संस्कारित” नेत्यांचे एकापाठोपाठ एक व्हिडिओ व्हायरल झाले. यात सुरेश धस यांचा पंटर खोक्या भोसले हरणाच्या शिकारींपासून ते नोटा उधळण्याच्या प्रकरणापर्यंत अडकला. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे प्रकरण देवेंद्र फडणवीसन कडे लावून धरल्याबरोबर खुन्नस म्हणून खोक्या भोसलेचे प्रकरण मुंडे समर्थकांनी अजितदादांकडे लावून धरले. अजितदादांनीही खोक्याला लगेच अटक करतो, असे आश्वासन मुंडे समर्थकांना देऊन टाकले.
तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्याला दम दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला क्षीरसागर यांनी त्या दमदाटीचे समर्थन केले पण गुन्हा दाखल व्हायचा तो झालाच त्यामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्या वाचून क्षीरसागर यांना देखील पर्याय उरला नाही.
क्षीरसागर यांच्या पाठोपाठ “पवार संस्कारित” दुसरे नेते आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यातच प्रकाश सोळंके मी दहा-बारा कोटी रुपयांमध्ये आमदार झालो इतरांनी 35 40 कोटी रुपये खर्च केले असे बोलून बसले त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती निर्माण झाली म्हणून प्रकाश सोळंकेने लगेच मी विनोदाने “कोटी रुपये” बोललो, प्रत्यक्षात ते “लाखच रुपये” होते. अजित दादांच्या राष्ट्रवादीने प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये दिले होते. त्यातले 23 लाख रुपये मी खर्च केले. उरलेले पक्षाला परत देऊन टाकले. हा व्यवहार सगळा चेकने झाला, असा खुलासा केला.
पण या सगळ्यामध्ये बीडच्या राजकारणाचे न्यारे वारे वाहिले आणि त्यामध्ये “पवार संस्कारित” नेत्यांनीच एकमेकांचे कपडे फाडले, हे उघड झाले. बीड मधल्या राजकारणाची ही घाण उपसण्यासाठी तुकाराम मुंडे यांच्यासारखे धडाडीचे आयएएस अधिकारी पाठवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. यावर आता फडणवीस कोणता आणि कसा निर्णय घेऊन “मास्टर स्ट्रोक” मारतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App