शासनावर अवलंबून न राहता समाज उभा करणे काळाची गरज; सहसरकार्यवाह अतुल लिमयेंचे प्रतिपादन; दादा लाड, महंत भारतभूषणदासजी महाराजांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

विशेष प्रतिनिधी

पुणे : “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. शासनावर अवलंबून न राहता काम उभे करणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार दादा लाड यांना, तर समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह राजन गोऱ्हे यांनी स्वागत केले.

अतुल लिमये पुढे म्हणाले, “समाजाचे शासनावरील अवलंबित्व वाढत चालले असून, यामुळे समाज अपंग बनण्याची भीती आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी समाज बदलवणाऱ्या यशस्वी प्रयोगांचा अनुकरणीय आराखडा तयार करून आदर्श कार्यप्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या दिशेने जाण्यासाठी हे कार्य अनिवार्य आहे.”

“आजकाल अनेक लोक हिंदुत्वाबद्दल मनात कटुता बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे,” असे मत अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतातील बौद्ध, जैन, शीख आणि वैदिक यांची एकत्रित परंपरा म्हणजेच हिंदुत्व होय. हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती आणि विचारधारा असून, तिला प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व होय. जनकल्याण समिती समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना संघटित आणि कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.” “मूल्यांची समज म्हणजेच धर्म होय. जोपर्यंत आजची पिढी नैतिक मूल्यांची कास धरून चालेल, तोपर्यंत धर्म अबाधित राहील,” असेही फिरोदिया यांनी नमूद केले.

भारतभूषण महाराज म्हणाले, “सनातन परंपरा आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. समाजाला वैभवशाली बनविण्यासाठी व्यावहारिक कार्याबरोबरच आत्मिक शांतीसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूल्यमापन बाहेर राहून करता येणार नाही, त्यासाठी संघात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल.

दादा लाड यांनी कापूस हे शेतकऱ्यांच्या वैभवाचे पीक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “विदर्भातील आत्महत्यांना दुर्दैवाने कापूस पिकाशी जोडले गेले. वास्तव पाहता, संपूर्ण जगाला कापडाची देणगी देणाऱ्या भारताचे कापूस हे मुख्य नगदी पीक आहे. कापसाचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर बोंडाचे वजन वाढणे गरजेचे आहे. मी कापूस पिकाची ‘गळफांदी’ काढून ‘फळफांदी’ लांबवण्याचे तंत्र विकसित केले. यामुळे कापसाच्या एका बोंडाचे वजन १० ग्रॅमपर्यंत वाढले आणि पर्यायाने एकरी उत्पन्न ४ ते ५ क्विंटलवरून थेट १५ क्विंटलपर्यंत पोहोचले.”

चिंचवडच्या पूर्वांचल छात्रावासमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. सेवा भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार मानले. प्रा. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

The need of the hour is to build a society without depending on the government.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात