विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या राजकीय मुहूर्तावर उद्धव ठाकरे नवे पाऊल टाकले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न असे म्हणत ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करून शिवशक्ती – भीमशक्ती युतीची गाठ बांधली आहे. पण बाळासाहेबांना अपेक्षित ही शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीची गाठ ठरणार की महाविकास आघाडीला फुटीचा फास बसणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Thackeray – Ambedkar Alliance may lead to cracks and split MVA in maharashtra
कारण एकीकडे ठाकरे – आंबेडकर आज युतीची घोषणा करण्यापूर्वीच दुसरीकडे बारामतीत या युतीच्या मुद्द्यावर पवारांनी कानावर हात ठेवले आहेत. मला काही माहिती नाही आणि त्या भानगडीत मी काही पडत नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे आंबेडकर युवतीची संभावना करून एक प्रकारे महाविकास आघाडीच्या शेवटचाच डंका वाजवला आहे.
प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना ठाम विरोध आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस – राष्ट्रवादीशी आघाडी टिकवून प्रकाश आंबेडकर यांच्याशी नवी युती केली आहे. भले ते पत्रकार परिषदेत आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचे बघावे असे म्हटले असले तरी अशा स्थितीत उद्धव ठाकरे एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवून शिवसेनेच्या ठाकरे गटाची वाटचाल पुढे ठेवू शकतील का? हा गंभीर शंकेचा विषय आहे. जे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकमेकांना राजकीय पाण्यात पाहतात, त्यांच्याशी युती करून उद्धव ठाकरे महाविकास आघाडी टिकवून धरू शकतील की आपोआपच आघाडीचे तारू या ठाकरे – आंबेडकर युतीच्या आणि संभाव्य जागा वाटपाच्या खडकावर फुटतील??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
– ठाकरेंचा स्वतंत्र मार्ग
उद्धव ठाकरेंना शिवसेनेतल्या उभ्या फुटी नंतर स्वतःचा मार्ग शोधायचा आहे. महाविकास आघाडीतला मर्यादित वाटा घेण्यापेक्षा आंबेडकरांबरोबर युती करून अमर्यादित वाटा उचलण्याचा त्यांचा इरादा दिसतो आहे. पण मूळात बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली ही शिवसेना ही शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची एकत्रित शक्ती आहे का??, हाच खरा प्रश्न आहे. कारण आज शिवशक्ती दोन गटांमध्ये विखुरली आहे आणि भीमशक्ती तर त्यापेक्षा दुप्पट तिप्पट गटांमध्ये विखुरली आहे. अशा स्थितीत शिवशक्तीचा एक गट आणि भीमशक्तीचा एक गट हे दोघेच एकत्र येत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
– बावनकुळे यांची शंका
पवारांनी ठाकरे – आंबेडकर युतीच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवले आहेतच, पण त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूळातच ही युती टिकण्याविषयी शंका व्यक्त केली आहे. ती शंका व्यक्त करताना उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वभावाविषयी टिप्पणी केली आहे. उद्धव ठाकरेंची युतीची मानसिकताच नाही. त्यासाठी तडजोड करावी लागते. ती तडजोड उद्धव ठाकरे करत नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर एक दिवशी कंटाळातील. कारण उद्धव ठाकरे संवादही करत नाहीत, असे टीकास्त्र बावनकुळे यांनी सोडले आहे.
– महाविकास आघाडीच्या शेवटचा डंका
म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग चोखाळत असताना दुसरीकडे पवारांनी ठाकरे – आंबेडकर युतीच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवणे आणि बावनकुळे यांनी युती अस्तित्वात येण्यापूर्वीच तिच्या टिकण्याच्या विषयी शंका व्यक्त करणे यातच महाराष्ट्रातल्या नव्या ठाकरे – आंबेडकर युतीचे भवितव्य सामावल्याचे दिसत आहे. किंबहुना एकीकडे ठाकरे – आंबेडकर युती होत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेवटाचा डंका वाजला आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App