विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sushma Andhare नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे आणि फडणवीस भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमुळे भुवया उंचावण्याचे काही कारण नसल्याचे त्या म्हणाल्या. एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. भाजप नेत्यांसोबत यापूर्वीही भेटी झाल्या आहेत, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.Sushma Andhare
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे सरळ तोंडाने बघितले नाही. मात्र, आज अचानक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यलयात जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर सुषमा अंधारे यांनी भाष्य करत एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
देवेंद्र फडणवीस हे फक्त एक व्यक्त नाही तर एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना भेटायला उद्धव ठाकरे गेले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. सध्या महाराष्ट्रातील जे अनेक प्रश्न आहेत, मराठवाडा अशांत आहे, बीड प्रकरण, परभणी जाळपोळ हिंसाचार असेल, त्यातील जबाबदार पोलिसांच्या बडतर्फीची मागणी असेल, दोन मृत्यू झाले त्याची चौकशी करायची आहे, अशा अनेक मुद्द्यांवर राज्यसंस्थेच्या प्रमुखांशी बोलणं गरजेचे आहे, शिवसेना पक्षप्रमुख ती मांडणी करत असतील तर त्यात काही हरकत नाही, असेही अंधारे यांनी म्हटले.
शिंदे मुख्यमंत्री, मात्र फडणवीसच खरे सूत्रधार
यापूर्वीही फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा अशी भेट झाली नाही. आताच ही भेट का घेतली, असा प्रश्न विचारला असता भाजप नेत्यांसोबत याआधीही भेटी झाल्या आहेत. त्याच्या बातम्या सुद्धा झाल्या. एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रकारे विश्वासघात केला, ते कोणालाच आवडणार नाही. शिंदे मुख्यमंत्री होते, तरी फडणवीस हेच खरे सूत्रधार होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भेटण्याचे कारण नव्हते. शिंदे गटातील निर्णय तेच ठरवायचे. कुठल्या नेत्याने निवडणूक लढायची, कुठून लढायची, कुणी नाही लढायची, हे सर्व फडणवीसच ठरवत होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
शिंदे गटातील लोकांची अस्वस्थता
भाजप-शिवसेना पुन्हा एक होणार का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणजे पॅच अप होणार आहे, हातात हात घालून बाहेर येणार आहेत, आता फडणवीस शिंदे-अजितदादांचा हात सोडणार आहेत, असे होणार नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. या सर्वामुळे खरी अस्वस्थता शिंदे गटातील लोकांची व्हायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App