नाशिक : छगन भुजबळांचे बंड ते मंत्रिमंडळाचे खातेवाटप या विषयांमध्ये अजितदारांच्या मर्यादा झाल्या उघड; काँग्रेस पुढे चालत होती “दादागिरी”, पण ती भाजप पुढे झाली गारद!!, अशीच अवस्था अजितदादांची झाली आहे.BJP destroys ajit pawar’s dominance in his own party
छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळांनी गेल्या दोन दिवसांत जो थयथयाट केला,त्यातून अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेतृत्वाच्या मर्यादा त्यांनी महाराष्ट्रासमोर उघड्यावर आणल्या. मला आधी शरद पवार + काँग्रेस आणि शिवसेनेतले लोक विश्वासात घेत होते, पण या राष्ट्रवादीत फक्त तिघेच निर्णय घेतात, असा दोषारोप भुजबळांनी अजित पवार + प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर लावला. मी काय त्यांच्या हातातलं खेळणं आहे का??, असा सवाल करून भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.
देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असताना माझ्या मंत्रिपदात कुणी खोडा घातला??, हे मी शोधूनच काढेल, अशी आव्हानाची भाषा भुजबळांनी वापरली, पण या सगळ्यावर अजूनही अजित पवार + प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उघडपणे भुजबळांवर काही बोलले नाहीत. भुजबळ यांनी अजितदादांच्या “पॉलिटिकल ऍडजेस्टमेंटचे सगळे डावपेचच उघड्यावर आणल्याने खरं म्हणजे अजितदादांची गोची झाली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर अजितदादांनी दिल्ली गाठल्याचे बोलले गेले. ते तिथे भुजबळांचे बंड आणि मंत्रिमंडळाचे खातेवाटप याविषयी भाजपच्या वरिष्ठांशी बोलण्याचे सांगितले गेले. पण मूळात भाजपचे वरिष्ठ आज दिवसभर “वन नेशन वन इलेक्शन” विधेयकात मग्न होते. त्यामुळे ते अजित पवारांना भेटले की नाही, याविषयी भाजपच्या गोटातून कोणताही खुलासा केला गेला नाही. तसा कुठलाच खुलासा खरं म्हणजे भाजपच्या गोटातून केलाच जात नाही.
एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळणार नाही, याच्या बातम्या माध्यमांनी भरपूर दिल्या होत्या. पण अजितदादांचे अर्थ खाते काढून घेतले जाईल, या बातम्या अधून मधून येत होत्या. आता त्या अर्थ खात्यासाठीच अजितदादा भाजपच्या नेत्यांचे उंबरठे झिजवत असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याचा अर्थ अजितदादांची भाजपच्या नेतृत्वाने किती मोठी गोची केली आहे, हेच स्पष्ट होते.
– “दादागिरी” एका झटक्यात मोडीत
याच अजितदादांची काँग्रेस + राष्ट्रवादी आघाडीमध्ये सरकारमध्ये “दादागिरी” चालायची. अनेकदा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा अजितदादांचा “रुबाब” मोठा असायचा. त्यावेळी शरद पवारांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे अजितदादाही काँग्रेसवर संधी मिळेल, तिथे राजकीय कुरघोडी करायचे. पण भाजपच्या महायुतीत आल्याबरोबर अजितदादांची ही “दादागिरी” एका झटक्यात खाली आली आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात त्या तुलनेत फारसे लक्ष घालायचे नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि अजितदादा एकमेकांकडे बघून घेतील, असा काँग्रेस हायकमांडचा सर्वसाधारण दृष्टिकोन असायचा.
– भाजपश्रेष्ठींची कृपादृष्टी असेल तरच…
पण मोदी + शाह यांच्या भाजपमध्ये वरपासून खालपर्यंत त्यांचे आणि त्यांच्या विश्वासू नेत्यांचेच वर्चस्व असते आणि त्या वर्चस्वाखालीच आपल्याला काम करावे लागते, याची प्रचिती आता अजितदादांना यायला लागली आहे. छगन भुजबळांचे बंड शमेल ना शमेल, भाजप त्यांचे एखाद्या राज्यपाल पदावर समाधान करेल किंवा न करेल, अजितदादांना देखील त्यांना हवे असणारे अर्थ खाते देईल किंवा देणार नाही, पण जे काही होईल, ते अजितदादांच्या “दादागिरीमुळे” होणार नाही, तर ते भाजप श्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळेच होईल. भाजप श्रेष्ठींची कृपादृष्टी टिकली नाही, तर अजितदादांनी कितीही “दादागिरी” केली, तरी त्यांना काही मिळणार नाही, ही अजितदादांच्या आजच्या राजकारणाची खरी मर्यादा आहे. जी त्यांच्या “दादागिरी”च्या प्रतिमेला पूर्ण छेद देणारी ठरणार आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App