महाराष्ट्रात शहरे – गावांमध्ये 72000 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम!!

  • राज्यात “एक तारीख एक तास” मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद
  • ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोक चळवळ झाली आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारापेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. Simultaneous cleanliness campaign in 72000 places in cities – villages in Maharashtra

उद्या (२ ऑक्टो.) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी,अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.

या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला; पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.

स्वच्छता कागदावर नको

स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये. असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

गड,किल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता

राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे,मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे.ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते पंतप्रधानांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्ट्राचाराची सफाई झाली.

चौपाटीवर नागरिकांचा उत्साह

गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या बरोबर आले होते. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांबरोबर हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी सुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्था देखील उतरल्या होत्या.स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल,नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नैशनलं हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या.

प्रारंभी ‘जय जय महाराष्ट्र, माझा राज्य’ गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी स्वच्छतेची प्रार्थना देखील घेण्यात आली.

Simultaneous cleanliness campaign in 72000 places in cities – villages in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात