विनायक ढेरे
नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिंदे घेरले आहे. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे इतकेच नव्हे, तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, पण असे असताना माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मात्र एवढे “सॉफ्ट” कसे??, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही नावे टाळली असती तर बरे झाले असते, एवढी “सॉफ्ट” प्रतिक्रिया व्यक्त केली आहे!! Shinde Fadanavis cabinet expansion : when supriya sule is aggressive, why ajit Pawar so politically soft on the government??
त्याआधी देखील मंत्रिमंडळ विस्तारात कोणी ना कोणीतरी नाराज होत असते. ज्यांना संधी मिळाली ते खुश असतात. पण ज्यांना संधी मिळत नाही ते नाराज होतात. असे घडतच असते, अशी “सॉफ्ट” प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अजितदादांच्या प्रतिक्रियेत फारसा फरक पडलेला नाही. काही नावे नसती तर बरे झाले असते, असे सांगून त्यांनी देखील राठोड, सत्तार आदींच्या नावावर आक्षेप घेतल्याचे दाखविले आहे. संजय राठोड हे पूजा चव्हाण हत्या / आत्महत्या प्रकरणात अडकले आहेत. तर अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे हे टीईटी परीक्षा घोटाळ्यात आली आहेत. अर्थातच हे दोन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. परंतु तरीही एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही घेरण्याची संधी सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, रविकांत वर्पे यांनी सोडलेली नाही.
सुप्रिया सुळेंचा साळसूद प्रश्न
सुप्रिया सुळे यांनी महिला शक्तीचा उल्लेख करत एकही महिला मंत्रिमंडळात कशी नाही?, असा थेट पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख करून साळसुद प्रश्न विचारला आहे. वास्तविक पाहता ठाकरे – पवार मंत्री मंडळात फक्त 3 महिला मंत्री होत्या आणि त्यातली एकच राज्यमंत्री राष्ट्रवादीचे होती. बाकी दोन्ही महिला मंत्री या काँग्रेसच्या होत्या. हे मात्र सुप्रिया सुळे सोयीस्कर रित्या विसरल्या!! अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याची उणीव लवकरच दूर होईल अशी ग्वाही दिली आहे त्यामुळे निदान शिंदे फडणवीस सरकारने सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची दखल तरी घेतल्याचे दिसून आले आहे.
चित्रा वाघांची राठोडांविरुद्ध लढाई कायम
चित्रा वाघ यांनी मात्र संजय राठोडांविरुद्धची आपली लढाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या वक्तव्यावर खुलासा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लोकशाही आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे प्रत्युत्तर दिले आहे. टीईटी घोटाळ्याच्या चौकशीची खात्री देखील त्यांनी दिली आहे पण अशा पद्धतीची खात्री द्यावी लागणे यातच राजकीय दृष्ट्या खोट दडलेली आहे.
अजितदादांच्या मनात नेमके काय??
पण एवढे सगळे सुरू असताना आणि सुप्रिया सुळे यांच्यासह बाकीचे विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले असताना अजित दादांनी मात्र तुलनेने मंत्रिमंडळाच्या विस्तारात काही नावे नसती तर बरे झाले असते, एवढेच प्रत्युत्तर देऊन आपली “सॉफ्ट लाईन” का दाखवली असेल??, अजितदादांच्या नेमके मनात आहे तरी काय?? लवासा पासून राज्य सहकारी बँकेचे प्रकरणे पुन्हा “ओपन” होत आहेत की काय??, याची चर्चा सुरू झाली आहे.
अधिवेशनात सॉफ्ट लाईन की हार्ड लाईन??
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्ताराबरोबरच वादही सुरू झाला आहे. असा वाद होणे विरोधी पक्षांसाठी सरकारला घेरण्याची सर्वात मोठी संधी असते. मग अजितदादांनी पहिल्याच दिवशी “सॉफ्ट लाईन” दाखवून नेमके काय साध्य केले आहे?? आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे. या अधिवेशनात अजितदादा आजचीच “सॉफ्ट लाईन” पुढे खेचत नेणार??, की ती लाईन नंतर “हार्ड” करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना अजितदादांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने देखील ते कोणती लाईन स्वीकारतात “हार्ड की सॉफ्ट”??, याला देखील राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या सत्ता स्पर्धेत “विशिष्ट” महत्त्व आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App