विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि “घड्याळ” हे मूळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिले. त्याच बरोबर त्या पक्षाला चिन्हांचे तीन पर्याय मागितले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे “कपबशी”, “शिट्टी” आणि “वडाचे झाड” हे चिन्हांचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठविले आहेत. या तीन चिन्हांमधून निवडणूक आयोग देईल ते चिन्ह आता पक्षाला मान्य करावे लागणार आहे. Sharad pawar’s NCP gives 3 options for their election symbol
पण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष “वडाचे झाड” या चिन्हासाठी आग्रही होता. शरद पवारांची महाराष्ट्रातली प्रतिभा आधार वडासारखा नेता अशी असल्याने वडाच्या झाडाचे चिन्ह पक्षाला प्रचारासाठी उपयोगी ठरेल, असा त्यांच्या समर्थकांचा होरा होता, पण “वडाचे झाड” हे चिन्ह विश्व हिंदू परिषदेचे अधिकृत चिन्ह आहे. विश्व हिंदू परिषदेने हे चिन्ह कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ नये, असा अर्ज निवडणूक आयोगाकडे आधीच केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला “वडाचे झाड” हे चिन्ह मिळण्याची शक्यता धूसर आहे.
“शिट्टी” हे महाराष्ट्रातल्या पालघर मधल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे चिन्ह होते. परंतु 2019 च्या निवडणुकीच्या वेळी त्या चिन्हावरून वाद झाला आणि निवडणूक आयोगाने ते चिन्ह गोठवून बहुजन विकास आघाडीला “रिक्षा” हे चिन्ह बहाल केले होते. शरद पवार गटाने “शिट्टी” या चिन्हाचा आग्रह धरला, तर कदाचित बहुजन विकास आघाडी त्यावर आक्षेप घेऊ शकते. त्यामुळे “कपबशी” हे उरलेले चिन्ह शरद पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे.
“वडाचे झाड”, “कपबशी” आणि “शिट्टी” ही निवडणूक चिन्हे सर्वसाधारणपणे ग्रामपंचायत निवडणूक, सहकारी सोसायटी निवडणूक किंवा बाजार समितीची निवडणूक यामध्ये वापरली जातात. पण आता शरद पवार गटाने या तीनच चिन्हांचा पर्याय दिल्याने आणि त्यातल्या त्यात “कपबशी” हे चिन्ह “मोकळे” असल्याने तेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App