विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स झाला असला, तरी प्रत्यक्षात आघाडीतल्या घटक पक्षांच्या परस्पर हितसंबंधांना अनेक ठिकाणी छेद गेला आहे. याचे परिणाम आता विधान परिषद निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात कोंडी केली आहे. Sharad pawar’s NCP and PWP come together to defuse shivsena UBT in konkan
उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या 21 पैकी 9 जागा मिळाल्या असल्या, तरी कोकणचा बालेकिल्ला मात्र त्यांना गमवावा लागला. कारण रायगड आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे पारंपारिक मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहिले नाहीत. त्यांना आपल्या दोन्ही जागा टिकवता आल्या नाहीत. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांचा पराभव केला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड मध्ये ठाकरेंचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणाच्या बालेकिल्ल्यात पीछेहाट झाली.
या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांना संधी देण्याचे घाटत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला. रायगड लोकसभा मतदारसंघात जयंत पाटलांच्या शेकापने अनंत गीतेंचे काम केले नसल्याने त्याचा फटका उद्धव ठाकरेंचा शिवसेनेला बसला. मात्र जयंत पाटलांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पराभवापासून आपले हात झटकून टाकले. शेकापने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. परंतु तरीही पराभव झाला. या पराभवाला शेकाप एकटा जबाबदार नाही, असा दावा जयंत पाटलांनी केला.
पण लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीतही जयंत पाटलांचा शेकाप आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. कारण कोकणातून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी त्यामुळे कमालीचे घटणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App