नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये माध्यम निर्मित चाणक्यांना मतदारांनी असा काही हिसका दाखवला की, त्यामुळे चाणक्यांची पुरती कोंडी झाली. मतदारांनी त्यांना आमदारांची संख्याच एवढी कमी दिली, की त्यातून त्यांना खरे कोणते डाव टाकताच येईनात म्हणून महाविकास आघाडीतून फक्त यांची आतषबाजी सुरू झाली.
अन्यथा मतदारांचा कौल थोडा जरी इकडे तिकडे झाला असता, तरी माध्यम निर्मित चाणक्यांनी डाव टाकण्याचा असा काही आव आणला असता, की मी मैदानात उतरतोच आणि अशी बाजी पलटवून टाकतो की तुम्ही बघतच राहाल!!
पण महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीतला कौल देताना चाणक्यांना फक्त 10 आमदारांचे नेते ठेवले. एकट्या भाजपला थेट बहुमताच्या मॅजिक फिगरपर्यंत नेऊन ठेवले. त्यामुळे चाणक्यांनी कुठला “डाव” टाकून आपल्या पुतण्याला भाजपपासून बाजूला केले किंवा अगदी एकनाथ शिंदेंना गळाला लावले, तरी भाजपला आकड्यांच्या हिशेबात काही फरक पडत नाही आणि चाणक्यांचा डाव काही सफल होत नाही, हे खुद्द त्यांच्याच लक्षात आले.
अन्यथा दिल्लीतील खान मार्केट गँगने काही युट्युबर्स आणि माध्यमांना हाताशी धरून भाजप वगळून आकड्यांचा डाव कसा जमेल, याचा हिशेब मांडलाच होता, पण तो हिशेब एवढा काही तिरपागडा होता, की तो जुळवता – जुळवता चाणक्यांची दमछाक झाली असती. उलट नाचक्की होऊन हातातले 10 आमदार नंतर जायचे ते सुरुवातीलाच निघून गेले असते. एकनाथ शिंदेंचे 57, अजितदादांचे 41, उद्धव ठाकरे यांचे 20 काँग्रेसचे 16 आणि चाणक्याचे 10, उरलेले 12 असा 156 चा आकडा जुळत असल्याचा दावा खान मार्केट यांनी केला होता. पण हे गणित जुळवणे फारच अवघड आहे. किंबहुना आपण हे गणित जुळवत असताना भाजपचे दिल्लीतले दोन चाणक्य 2019 सारखे हातावर हात ठेवून बसणार नाहीत, उलट ते आपलेच उरलेसुरले आमदार आणि पक्ष घेऊन जातील, याची भीती चाणक्यांना वाटली.
त्यामुळे चाणक्य सुमडीत कोंबडी कापत आपले सु आणि कुप्रसिद्ध “डाव” टाकण्यापासून बाजूला झाले. काँग्रेसच्या राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून पराभवाचे खापर नेहमीप्रमाणे ईव्हीएम वर फोडणे पसंत करून ते बाबा आढावांच्या भेटीला जाऊन मोकळे झाले.
अर्थात चाणक्यांची ही कोंडी दिल्लीत बसलेल्या दोन चाणक्यांनी केली नाही, तर ती महाराष्ट्रातल्या मतदारांनी केली. महाराष्ट्रातल्या मतदारांनी माध्यम निर्मित चाणक्यांची खरी “राजकीय औकात” जेवढी ओळखली आहे, तेवढी दिल्लीतल्या कुठल्याच चाणक्यांना ओळखता आलेली नाही, याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या मतदारांनी चाणक्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस आणून दिला. त्यांची “चाणक्यगिरी” पुरती धुळीस मिळवली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App