विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी केली आहे. पवारांनी पत्रातून बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारायची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पवारांनी आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक पत्रे पाठवली. त्यामध्ये प्रामुख्याने साखर कारखाने, ऊस उत्पादक, साखर उत्पादक, महाराष्ट्रातले बिल्डर यांना मदत करण्याची मागणी असायची. पण पवारांनी पाठविलेल्या ताज्या पत्रात मात्र दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचा संदर्भ आहे. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्याबद्दल पवारांनी त्यांचे आभार मानले.
त्याचवेळी ज्या तालकटोरा स्टेडियमवर हे साहित्य संमेलन भरले होते, त्याच स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे पूर्ण कृती पुतळे उभारायची मागणी केली. मूळात ही मागणी साहित्य संमेलनाचे संयोजक सरहद संस्थेने केली. त्या मागणीला पवारांनी पत्राद्वारे दुजोरा दिला.
मराठ्यांनी दिल्लीवर थोरले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली पहिली स्वारी केली, त्यावेळी त्यांनी तालकटोरा स्टेडियम असलेल्या भागातच पहिली छावणी उभारली होती. त्यावेळी मल्हारराव होळकर पेशव्यांचे सरदार त्यांच्या समवेत होते. मराठ्यांच्या दिल्ली स्वारीच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा मेळावा यासाठी याच स्टेडियमवर मराठा सेनानींचे पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलेल्या अनेक साहित्यिकांनी केली.
पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून साहित्यिकांच्या विनंतीचा विचार करण्याची मागणी केली. संबंधित तालकटोरा स्टेडियम दिल्ली महापालिकेच्या अखत्यारित येते. पुतळे उभे करण्यासाठी महापालिकेच्या काही परवानग्या लागतात. त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे देखील पवारांनी पत्राद्वारे मागणी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App