प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांचे भाजप संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या भोवती बचावाचा कोट उभारला आहे. शरद पवारांचे भाजपशी आजही संबंध आहेत. फडणवीस – अजितदादा शपथविधीच्या वेळी त्याची प्रचितीच आली होती, असे संशयाचे बोट प्रकाश आंबेडकरांनी दाखवताच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकापाठोपाठ एक नेते शरद पवार यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. Sharad Pawar – BJP relations, NCP leaders trade guns towards prakash Ambedkar
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी आणि आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांचा बचाव करताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार तोफा डागल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी युती केली, त्याआधी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास हरकत नाही. परंतु त्याची जबाबदारी ठाकरे गटाने घ्यावी, असे सांगत निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाने त्यांच्या वाट्यातील जागा वंचितला द्याव्यात, असे सुचवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत ‘जर सामंजस्य नसेल तर एकत्र राहण्याचे नाटक का करायचे, असे म्हटले. तरीही हा वाद संपला नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांना सुनावले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार साहेबांविषयी आदराने बोलावे. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही, असा इशारा देणारे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
तर प्रकाश आंबेडकर यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे, याचा शोध घ्या, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. प्रकाश आंबेडकरांना भाजपने हिप्नोटाईज केले असावे. त्यामुळेच ते असे विचित्र बोलत असल्याची टीका मिटकरींनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरचे जयंत पाटलांचे वक्तव्य पुन्हा एकदा ऐका आणि मग मला प्रश्न विचारा अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना उत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण?
पवार साहेब काय आहेत? हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. प्रकाश आंबडेकरांनी भाजपाची बी टीम एमआयएमसोबत हातमिळवणी केली होती. त्यांच्यासोबतही आंबेडकरांचे पटले नाही. त्यांचे कुणासोबतच पटू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांनी लवकरच शुद्धीवर यावे. शरद पवार भाजपाचे असते तर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन त्यांनी भाजपाला रोखले नसते. ‘५० खोके, एकदम ओके’ करुन आणि सूरत तसेच गुवाहटीच्या कामाख्या देवीला आमदारांना नेऊन आघाडी सरकार पाडले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून शरद पवार भाजपाचे होत नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या शब्दावर देश चालत नाही. शरद पवारांची उंची काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पवारांनी सत्तेचा विचार केला नाही. सत्तेसाठी काम करणारे पवार नाहीत. प्रकाश आंबडेकर यांनी शुद्धीवर येऊन बोलले तर बरे होईल, अशी खरमरीत टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरले होते.
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर पवारांचा बचाव करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांवर एकापाठोपाठ तोफा डागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App