विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सातत्याने आपल्या टार्गेटवर ठेवलेल्या गौतम अदानींच्या घरी I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार पोहोचले आहेत. नेहमीप्रमाणे या भेटीचे कारण शरद पवार किंवा अदानी या दोघांनी अधिकृतपणे सांगितले नाही. मात्र, एका खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार हे अदानींच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. Sharad Pawar at Gautam Adani’s house in Ahmedabad
विशेष म्हणजे शरद पवार आज अहमदाबादेत अदानी यांच्या घरीच मुक्काम करतील आणि उद्या मुंबईला निघतील, अशी सूत्रांची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षातील शरद पवार आणि गौतम अदानी यांची ही तिसरी भेट आहे.
एकीकडे राहुल गांधींनी गौतम अदानींना सतत आपल्या टार्गेटवर ठेवले आहे, तर दुसरीकडे I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार अदानींच्या घरी मुक्कामाला जातात, यातून शरद पवारांनी I.N.D.I आघाडीच अदानी मुद्द्यावर उघडी पाडली आहे.
हिंडेनबर्ग अहवालावर अदानींची पाठराखण
हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींची जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, शरद पवार यांनी जेपीसी चौकशीतून फारसा फायदा होणार नाही तसेच, हिंडेनबर्गचा अहवाल किती विश्वासार्ह्य मानायचा??, असा सवाल करून अदानींची पाठराखण केली होती.
मात्र हिंडेनबर्ग अहवालावरून गौतम अदानींविरोधात विरोधक आक्रमक झालेले असतानाच गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती. यावेळी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड तब्बल 2 तास चर्चा झाली होती. या भेटीचा तपशील समोर आला नाही. मात्र, यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अदानींबाबत विरोधकांहून वेगळी भूमिका?
20 एप्रिलनंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती. यावेळी दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. याही भेटीचा तपशील समोर आला नव्हता. आता शरद पवार हे तिसऱ्यांदा गौतम अदानींना भेटत आहेत. त्यामुळे विरोधकांची गौतम अदानींबाबत असणारी भूमिका आणि शरद पवार यांची अदानींबाबतची भूमिका यात अंतर असल्याचे दिसते. विशेष म्हणजे गौतम अदानींवर हिंडेनबर्ग अहवालातून गंभीर आरोप झाल्यानंतर अदानींच्या मालकीच्या वृत्तवाहिनीवर मुलाखत देत शरद पवारांनी अदानींची पाठराखण केली होती. पूर्वी टाटा, बिर्ला यांच्यावर आरोप व्हायचे, तसे आता अदानींवर होत असल्याचेही शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे पुन्हा अदानींबाबत इंडिया आघाडीत एकी नाही? शरद पवारांची भूमिका वेगळी आहे, असे बोलले जात आहे.
अदानींचा बारामती दौराही चर्चेत
2 जूननंतर 16 जून रोजी शरद पवारांच्या बारामतीत एका कार्यक्रमासाठी गौतम अदानींनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन अदानींनी केले होते. यावेळी तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारही उपस्थित होते. त्यामुळे अदानींचा हा बारामती दौराही चांगलाच चर्चेत राहिला होता.
विरोधकांना सूचक संदेश
आज गौतम अदानी यांच्या एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार अहमदाबादेत गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील आहेत. त्यामुळे ही एक कौटुंबिक भेट असू शकते, असेही सांगण्यात येत आहे. काहीही असले तरी अदानींसोबत शरद पवारांची ही तिसरी भेट असल्याने यावरुन आता राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App