नाशिक : योगींनी दिला नारा बटेंगे तो कटेंगे, पण काका – पुतणे बटेंगे तो बढेंगे क्या??, असा सवाल काका – पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय हालचालींमधून तयार झालाय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला बटेंगे तो कटेंगे हा नारा हिंदूंच्या एकजुटी संदर्भातला आहे. तो व्होट जिहाद विरोधात दिलाय. परंतु काका – पुतणे मात्र महाराष्ट्रात आधीच बटले आहेत. म्हणजेच वेगवेगळे झाले आहेत. ते वेगवेगळे लढत आहेत. पण निवडणुकीनंतर ते एक झाले, तर काही वेगळेच समीकरण तयार होईल का??, आणि दोघे मिळून वाढतील का??, हा कळीचा सवाल आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, दिलीप वळसे पाटलांनी हा खडा आधीच टाकून पाहिला आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पवार एक होऊ शकतात. सत्तेचे नवे समीकरण जुळू शकते, असे दोन्ही नेते कालच म्हणाले होते. याचा अर्थ अजितदादांच्या गोटातले नेते पवारांच्या गोटातत जायला उतावीळ झाले आहेत, पण अजितदादांनी मात्र त्याबद्दल सावध पवित्रा घेत आम्ही महायुती पूर्ण बहुमताने निवडून आणायच्या कामाला लागलो होतो, असे सांगून हात झटकले.
सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवारांनी ती शक्यता फेटाळून लावली. पण त्याची कारणे वेगवेगळी आहेत. अजितदादा शरद पवारांकडे परत आल्याने सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वाला धक्का लागू शकतो. त्यामुळे या दोघांना अजितदादा परत येणे नकोय. पण शरद पवारांनी मात्र अजितदादांना ईडी + सीबीआयच्या कारवाईची वाटणारी भीती अधोरेखित करून ते जोपर्यंत मोदींची सत्ता केंद्रात आहे, तोपर्यंत ते परत येणार नाहीत, असे स्पष्ट सांगून टाकले आहे. हे सगळ्यात मोठे राजकीय सत्य आहे.
138 पैकी किती??
पण त्या पलीकडे जाऊन आकड्यांच्या हिशेबात विचार केला, तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी महाराष्ट्रात 138 जागा लढत आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 87, तर महायुतीच्या जागावाटपात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 51 जागा आल्यात. याची बेरीज 138 होते.
138 पैकी दोघेही काका – पुतण्या मिळून किती स्ट्राईक रेट ठेवू शकतात आणि दोघे मिळून 100 च्या वर आमदार निवडून आणू शकतात का??, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसे झाले, तर पवार आपल्या राजकीय आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात का होईना पण, डबल डिजिट आकडा ओलांडू शकले, असे म्हणता येईल. आणि खरंच ते नवे समीकरण जुळवून आणायच्या कामाला लागतील. इथे पवारांचे वर्चस्व निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पण हे सगळे होत असताना मोदी – शाह तिकडे दिल्लीत हातावर हात ठेवून बसतील का?? आणि इकडे ठाकरे, शिंदे – फडणवीस खर्रा चोळत बसतील का??, हे दोन गंभीर सवाल आहेत आणि या सवालांच्या उत्तरातच महाराष्ट्राच्या नव्या – जुन्या समीकरणांचे खरे इंगित दडले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App