विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मेट्रो-2अ आणि मेट्रो-7 या मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने, या सोहळ्यावर भाजपने बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मेट्रोच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. Scratched Metro – 3 projects should also be paved; Devendra Fadnavis slammed Thackeray government !!
आम्हाला सोहळ्याचं आमंत्रण दिलं नाही तरी चालेल, मात्र प्रकल्प मार्गी लावा, अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. या मार्गिकांचे काम मी सुरू केले होते, पण या सरकारच्या काळात ते रखडले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
उद्घाटन सोहळ्याला माझ्या शुभेच्छा आहेत. पण या दोन्ही मेट्रो मार्गिकांचं काम मी सुरू केलं होतं, त्या कामाला चांगलाच वेगही आला होता, हे जनतेला चांगलंच माहीत आहे. काही कारणांमुळे ठाकरे सरकारच्या काळात हे काम रखडलं, पण आता ते सुरू होत आहे. त्यामुळे आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा, मेट्रो-3 चा प्रकल्प निकाली काढा, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केलं आहे.
मेट्रो-3 जी आतापर्यंत सुरू होऊ शकली असती, ती अजून 4 वर्ष सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरुर घ्यावं, पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो-3 चा रखडलेला प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा. नऊ महिन्यांमध्ये कारशेड आरेमध्ये सुरू होऊ शकतं आणि मुंबईतील सर्वात महत्वाची ही मेट्रो-3 लाईन सरकारने मुंबईकरांसाठी सुरू करावी. त्या उद्घाटन सोहळ्याला देखील आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
मेट्रो-२ अ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक येथे शनिवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाचे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले नाही. मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना रोवली होती. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण आहे. भाजपने या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यामुळे आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more