साताऱ्यातील पाठकजी कुटुंबाने आपल्या घरच्या गणपतीसाठी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचा देखावा उभा केला आहे. तो उभा करण्यामागची प्रेरणा त्यांच्याच शब्दांत. satara patha family home ganpati ayodya mandir decoration
‘ज्ञानगणेश’, ‘संगीतगणेश’, ‘क्रीडागणेश’, ‘वारलीगणेश’, ‘अर्थगणेश’, ‘विद्यागणेश’ आदी संकल्पनांवर आधारित गणेश सजावटीनंतर यंदा आम्ही आमच्या साताऱ्याच्या घरी ‘श्रीराम गणेश’ ही संकल्पना घेऊन घरच्या गणपतीसमोर सजावट साकारली आहे. अनेक शतकांच्या लढ्यानंतर येत्या जानेवारीत अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभे राहत आहे, त्या निमित्ताने आम्ही यंदा ही संकल्पना घेऊन सजावटची मांडणी केली आहे. अयोध्येतील मंदिराची अतिशय देखणी अशी प्रतिकृती शेखर हसबनीस, श्वेता जंगम, प्रणव सपकाळ, अमोल दरडी, अभिनव लाड, चैतन्य पोफळे, हर्षल चेंडके यांनी साकारली आहे. गेले काही दिवस या मंदिरनिर्माणाचा ध्यास या सर्वांनी घेतला होता.
या सजावटीच्या औपचारिक उद्घाटनासाठी उद्या, ऋषी पंचमीला समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे आणि समर्थांच्या घराण्यातील वंशज श्री भूषणस्वामी येत आहेत. आपल्यापुढे गेल्या अनेक वर्षांत विविध माध्यमांतून श्रीराम कथा उलगडत गेली आहे. या रामकथेची विविध रूपं या सजावटीत आहेत. श्री समर्थ वाग्देवता मंदिरम्, धुळे यांनी प्रकाशित केलेल्या संत रामदास स्वामीलिखित वाल्मिकी रामायणातील चार खंडांपैकी एक किष्किंधाकांड हा ग्रंथ, संत तुलसीदासांचे सन १९१३ मध्ये प्रकाशित झालेला श्रीरामचरितमानस (श्री तुलसी रामायण) ग्रंथ, सन १९१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चित्ररामायण’ या भवानराव श्रीनिवासराव पंडित ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी संस्थान, औंध यांच्या पुस्तकातील चित्रांपैकी काही चित्रे या सजावटीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
रामाच्या आयुष्यावर आधारित एकवचनी एकबाणी या स्वामी विज्ञानानंद यांच्या कादंबरीचे ई बुक, याशिवाय रामायण घराघरांत पोहोचवणारे आकाशवाणीवरील गीतरामायण आणि रामानंद सागर यांचे ‘रामायण’ या अन्य माध्यमांतील रामायणाचीही प्रातिनिधिक स्वरूपातील दखल आम्ही घेतली आहे.
प्रभू रामचंद्रांबद्धल अनेक संत आणि कवींनी केलेल्या काव्यपक्तींचा समावेश या सजावटीत आहे; तसेच श्री रामरक्षेची जन्मकथाही त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या राशिवडे येथील अनिल कावणेकर यांनी यासाठी अक्षरलेखन केले असून, नंदकुमार पोतदार यांनी यासाठी चित्रे काढली आहेत. याशिवाय श्रीरामचंद्र आणि अयोध्येबाबत विविध लेखांचा समावेश असलेल्या ‘सकाळ’च्या ‘अयोध्यापर्व’ या पुरवणीचा समावेशही करण्यात आला असून, अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या वार्तांकनाचाही यामध्ये समावेश आहे. अयोध्येतील मंदिरासाठी आयुष्य वेचणाऱ्या, या रामजन्मभूमी लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्वांना यंदाचा ‘श्रीराम गणेश’ आम्ही अर्पण करीत आहोत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आणि मनामनात राम आहे, हाच राम आम्ही यंदा गणेशोत्सवानिमित्त सर्वांसमोर आणला आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांत सांगायचे तर…
छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडिली… कोणा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली…
दर वर्षी प्रमाणे या श्रीराम गणेशाच्या दर्शनासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
– पाठकजी कुटुंबीय, खण आळी, सातारा गणेश चतुर्थी, २०२३
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App