मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊ या; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अमित शाह, नड्डांची श्रद्धांजली


प्रतिनिधी

पुणे : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य मदनदासजी यांनी केले. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून काम वाढविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मदनदासजी देवी यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया, असेही ते म्हणाले.  Sarsangchalak Dr. Tribute to Mohan Bhagwat, Amit Shah, Nadda

ज्येष्ठ प्रचारक आणि संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे काल पहाटे बेंगळूरू येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात आणण्यात आले. रा.स्व. संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशान भूमी येथे मदनदासजी यांचे पुतणे राधेश्याम देवी यांनी अंतिम संस्कार केले.

याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ. भागवत बोलत होते. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदि उपस्थित होते.

मदनदासजी देवी व्यक्तीच्या मनाला स्पर्श करीत असत. जीवनाला योग्य दिशा देणारे ते पालक होते. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे नाही. अशावेळी आंतरिक ज्वलन सहन करीत असताना देखील त्यांनी स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. जाताना देखील ते आनंददायी आणि आनंदी होते, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.

सरसंघचालक म्हणाले, मदनदासजी देवी यांच्या जाण्याने मनामध्ये संमिश्र भावना आहे. जन्ममृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. जो हजारो-लाखो लोकांना आपुलकीने बांधतो अशा व्यक्तीच्या जाण्याचे दुःख सर्वव्यापी असते. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठ्या जनसमुदायाला देखील दुःख झालेले आहे. त्यांनी केवळ संघटनेचे काम केले असे नाही तर मनुष्य जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. व्यक्तीच्या मनाला स्पर्श करण्याची कला त्यांना अवगत होती. ते कार्यकर्त्यांना आपले मानायचे, त्यांना सांभाळायचे. मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा देखील हा अनुभव मी घेतला. बालवयातील शाखेच्या मित्रांपासून ते विविध संघटनांच्या प्रमुखांपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ते सर्वांची काळजी करायचे. प्रत्येकाची त्यांना संपूर्ण माहिती असायची.

त्यांचा स्नेहस्पर्श झाला ही मी धन्यता मानतो. मदनदासजी संघटनेचे आणि विचारांचे पक्के होते. कार्यकर्त्यांनी केलल्या चुका ते स्नेहपूर्वक दुरुस्त करायचे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करताना व्यक्तीचे अवमूल्यन होणार नाही याची ते दक्षता घेत. यशवंतराव केळकर यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम वाढविले. मनुष्याला मोह बिघडवतो. या सर्वांच्या पलीकडे जाऊन ध्येयाप्रती समर्पित कार्यकर्ते त्यांनी तयार केले. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, माझ्या जाण्यानंतर हे काम न थांबवता आणखी वाढत जाईल ही शिकवण त्यांनी दिली आहे. आजारपणामुळे ते मागील काही वर्ष सक्रिय कामात नसले तरी देखील त्यांच्यामध्ये एकटेपणा आलेला नव्हता. ते अतिशय स्थितप्रज्ञ होते. अंतिम क्षणी देखील ते हसतमुख होते. ध्येयाप्रती असलेल्या क्रियाशील समर्पणातून आलेली ही प्रसन्नता होती, असे डॉ. भागवत म्हणाले. कार्याचा जो मंत्र त्यांनी आम्हाला शिकवला त्यानुसार पुढे जात राहणे, ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

संघटनेचे तत्वज्ञान रुजवले- मराठे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वैचारिक बैठक तयार करण्याचे आणि संघटनेचे तत्वज्ञान उत्तमप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्याचे अत्यंत महत्तपूर्ण काम मदनदासजी यांनी केले. संघटनेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान दिले. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध हे पारिवारिक स्वरूपाचे होते. कार्यकर्त्याच्या केवळ संघटनेतील कामाची नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनाची ते काळजी घेत असत, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी सांगितले. अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रेमळ स्वभाव आणि आत्मियता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या प्रेरणेने देशात हजारो कार्यकर्ते तयार केले, असेही मराठे म्हणाले.

साऱ्यांचे सहकारी : नड्डा

देशातील हजारो कार्यकर्त्यांना मदनदासजींनी कार्याची दृष्टी दिली, त्यांना जीवनदिशा दिली, त्यांच्यावर संस्कार केले आणि जीवनाला उद्देश दिला, अशा शब्दांत जे. पी. नड्डा यांनी मदनदासजींच्या कार्याचे वर्णन केले. साऱ्या युवकांना ते आपले वरिष्ठ सहकारी आहेत, असेच नेहमी वाटत असे. त्यांचे मार्गदर्शन ज्याला घ्यायचे असेल त्याच्यासाठी ते सदैव सहजतेने उपलब्ध होत असत. संघटनेसमोर अनेक अडचणी असतानाही संघटनेचा विचार कसा पुढे नेता येऊ शकतो, हे आम्ही त्यांच्याकडे पाहून शिकलो, असेही नड्डा म्हणाले. संघटनशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. प्रवास कसा करायचा, बैठक कशी घ्यायची, वार्तालाप कसा करायचा अशा अनेक गोष्टींचे धडे ते कार्यकर्त्यांना देत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग अधिक सुदृढ करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही नड्डा यांनी सांगितले.

मोतीबाग येथे अंत्यदर्शन संघ कार्यालयात सरसंघचालक आणि सरकार्यवाहांची आदरांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थ मंत्र्यांपर्यंत सर्व स्तरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती राहिली. अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यापूर्वी त्यांचे पार्थिव शहरातील मोतीबाग संघ कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक दशकांपासून त्यांचे जवळचे सहकारी असलेल्यांपासून ते ज्यांना त्यांनी दीर्घकाळ मार्गदर्शन केले असे कार्यकर्ते, तसेच रा. स्व. संघ आणि संबंधित संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी स्व. मदनदासजी यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मदनदासजी देवी यांचे भाऊ खुशालदास देवी, भगिनी आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

स्व. मदनदासजी यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेर होसबाले, रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेशजी सोनी व अनिरुद्ध देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, माजी प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, अभाविपचे अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चौहान, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे आदींचा समावेश होता. श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे प्रमुख होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.

पुणे, मुंबई, दिल्लीत श्रद्धांजली सभा

मदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ जुलै रोजी दिल्लीत, ७ ऑगस्ट रोजी पुण्यात आणि ८ ऑगस्ट रोजी मुंबईत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sarsangchalak Dr. Tribute to Mohan Bhagwat, Amit Shah, Nadda

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात