सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते, ज्येष्ठ मराठी साहीत्यिक शरणकुमार लिंबाळे त्यांच्या निर्भिड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपेक्षाही मराठी भाषेसाठीचे विद्यापीठ आधी सुरु करा, असे त्यांनी सोमवारी (दि. 27) पुण्यात सुनावले. Saraswathi Sanman Award winner Sharankumar Limbale asked Uddhav-Pawar State Government to form Marathi University rather than running after so called status of Classical Language.
प्रतिनिधी
पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र त्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करणारे पुरावे अशी मागणी करणाऱ्यांना अद्याप देता आलेले नाहीत. त्यामुळे या तोकड्या पुराव्यांच्या आधारे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर देशातल्या इतर अनेक भाषांनाही तसाच दर्जा द्यावा लागेल. या तांत्रिक अडचणींमुळे केंद्र सरकारने मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही.
मात्र ही तांत्रिकता मुद्दाम दडवून ठेवत केंद्र सरकारवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न तथाकथीत मराठीप्रेमींकडून होत असतो. अशा बुर्झ्वा मराठीप्रेमींना यंदाचे सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते साहीत्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी चांगलेच फटकारले आहे.
लिंबाळे म्हणाले की, अजूनही गुजराती सोडाच पण राष्ट्रभाषा म्हणवल्या जाणाऱ्या हिंदीला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. या पद्धतीने मराठीला हा दर्जा मिळेल असे वाटत नाही. पण त्यापेक्षा मराठी भाषेचे विद्यापीठ पुण्यात सुरू झाले तर सर्व प्रश्न सुटतील. पुणे हे संस्कृतीचे माहेरघर असल्याने शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ पुण्यातच सुरू केले पाहिजे.
आत्तापर्यंत तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, उडिया या भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला. जी भाषा दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची प्राचीन भाषा आहे, ज्या भाषेत प्राचीन ग्रंथनिर्मिती झाली आहे आणि त्या भाषेवर इतर भाषांचा प्रभाव असता कामा नये अशा तीन निकषांवर अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. मराठी इतकी जुनी भाषा आहे की नाही हे मला माहिती नाही, असे लिंबाळे म्हणाले. मात्र, अभिजातपणाचा आग्रह धरण्याऐवजी मराठी भाषेचे विद्यापीठ सुरु झाले तरी सगळे प्रश्न सुटतील. हे विद्यापीठ सुरू झाले तर संशोधनही मराठीत होईल. सगळ्या प्रक्रिया मराठीतून होतील, असे त्यांनी सांगितले.
सेना, मनसेलाही फटकारले महाराष्ट्रात दोन पक्ष आहेत. एक शिवसेना आणि दुसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पण दुदैवाची गोष्ट अशी की, शिवसेनेला मराठी माणूस मुंबईत आणि बेळगावला दिसतो. मनसेला मराठी भाषा फक्त दुकानांच्या पाट्यांवर दिसते. या पलीकडे मराठी भाषा फार मोठी आहे हे या दोन्ही पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात लिंबाळे यांनी फटकारले. दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मराठी भाषेसाठी संघर्ष करत आहेत ही चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिलीपराज प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात शरणकुमार लिंबाळे आणि यंदाचे साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते लेखक आबा महाजन यांचा मँगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात लिंबाळे बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, नंदकिशोर बजाज आदी यावेळी उपस्थित होते.
माझा जन्म खान्देशात झाला. वडील अशिक्षित आणि कुटुंबातही वाचनाचे वातावरण नव्हते. श्यामची आई पुस्तकाने भारावलो गेलो आणि पुस्तकाची गोडी लागली, असे आबा महाजन म्हणाले. साहित्य अकादमी पुरस्काराने आकाश ठेंगणे झाल्यासारखे झाले आहे. पुस्तक जर दर्जेदार असेल तर वयाच्या कोणत्याही वर्षी पुरस्कार मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, हेमलकसासारख्या दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या भागात काम करणे, हेच आमच्यापुढे एक मोठे आव्हान होते. बावीस वर्षे हेमलकसामध्ये वीज नव्हती. अशावेळी वाचन दुरापास्त व्हायचे. परंतु, बाबांमुळे अनेक दिग्गज साहित्यिक आणि संगीतकार प्रत्यक्ष हेमलकसाला नियमितपणे येत असल्याने आम्हाला नेहमी लेखकच वाचायला मिळाले. या लेखकांच्या लेखनाने आणि लेखकांच्या प्रत्यक्ष सहवासाने आम्ही समृद्ध झालो.
Saraswathi Sanman Award winner Sharankumar Limbale asked Uddhav-Pawar State Government to form Marathi University rather than running after so called status of Classical Language.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App