विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच असा अचानक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. पण या स्तुती सुमनांचे रहस्य लवकरच उघड झाले कारण ती स्तुती सुमने निर्भेळ नसून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टार्गेट करण्यासाठीच उधळण्यात आल्याचे उघड झाले.
देवेंद्र फडणवीस यांनी 1 जानेवारी 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यात लॉईड स्टील प्लांटचे भूमिपूजन केले. त्यांनी 11 नक्षलवाद्यांना शरण आणले दुर्गम भागात एसटी सुरू केली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नव्हे, तर पहिला जिल्हा करण्याची प्रतिज्ञा केली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या सामनाने फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय योग्य असल्याचे सामनाने अग्रलेखात नमूद केले. गडचिरोलीला पोलाद सिटी करण्याचे ध्येय फडणवीस यांनी लवकर पूर्ण करावे. तिथल्या जनसामान्यांना सर्व प्रकारचा विकासाचा स्पर्श करावा, अशा शुभेच्छा सामनाने दिल्या, पण त्या नंतर सामनाने अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले. एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी गडचिरोलीत हप्ते गोळा करण्यासाठी एजंट नेमल्याचा आरोप सामनाने केला. त्यांच्याऐवजी आता फडणवीस गडचिरोलीचे “पालक” झाल्याने गडचिरोली वेगवान विकास करेल, असा टोला सामनाने शिंदे यांना लगावला. संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत सामनाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
दुसरीकडे वाल्मीक कराड प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना पुन्हा घेरले. अजित पवार कुठल्या गोष्टी सहन करत नाही पण वाल्मीक कराडची गाडी त्यांनी आपल्या ताफ्यात सहन कशी काय केली??, असा सवाल करून आव्हाड यांनी अजितदादांना टोचले.
त्याचवेळी पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. सध्या महायुतीच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच ऍक्टिव्ह दिसत आहेत, हे चांगले आहे. त्यांनी काम करत राहावे, अशा सदिच्छा सुप्रिया सुळे यांनी दिल्या त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला हाणला. ते ऍक्टिव्ह दिसत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला.
त्यामुळे ठाकरे आणि पवारांच्या पक्षांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली असली, तरी ती निर्भेळ नव्हती. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टोचण्यासाठी फडणवीस यांची ती स्तुती होती हे सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App