प्रतिनिधी
मुंबई/नाशिक : शिवसैनिकांचे मेळावे घेऊन आदित्य ठाकरे जस जसा बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत, तसतसे बंडखोर आमदार, खासदार देखील आता खुलेपणाने आदित्य ठाकरे यांना टार्गेट करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत बंडखोरांनी ठाकरे परिवारावर टीका करायचे टाळले होते. परंतु, आदित्य ठाकरे आक्रमकपणे बंडखोर आमदारांना गद्दार, विश्वासघातकी अशा आक्रमक भाषेत संबोधत असताना बंडखोर आमदारांना आणि खासदारांना देखील प्रत्युत्तर देण्याखेरीज पर्याय उरलेला दिसत नाही. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आदित्य ठाकरे यांना सडेतोडपणे प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. खासदार राहुल शेवाळे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे या दोघांनीही उघडपणे आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्याशी पंगा घेतला आहे. Rebel MLAs – MPs who avoided criticizing the Thackeray family now directly reply to Aditya Thackeray
खासदार राहुल शेवाळे यांचा हल्लाबोल
शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले. त्याच वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने काम केले. युतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना वरळीच्या मतदारांनी निवडून दिले आणि आशीर्वादही दिला. मात्र त्यांची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणं ही गद्दाराची व्याख्या कशी होऊ शकते?, हे पहिले तपासून पाहावं लागेल. गद्दार कोण हे वरळी विधानसभेतील मतदार येणाऱ्या निवडणुकीतच देतील, असे म्हणत राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.
यासह लोकसभा गटनेतेपदाचे पत्र 18 जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना दिले होते, असे म्हणत त्यांनी दावा केला. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पत्र देण्याची कायदेशीर पूर्तता आम्ही 18 तारखेला केली आणि परिपत्रक 19 जुलै रोजी निघाले. चिराग पासवान प्रकरणातही तेच झालं. त्यावेळी चिराग पासवान यांच्या काकांना गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आले. तसा उच्च न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. त्यामुळे विनायक राऊत बोलतात त्यामध्ये तथ्य नाही. सर्व गोष्टीची कायदेशीर पूर्तता झाली असल्याने या गोष्टींचा सर्वोच्च न्यायालयात टिकाव लागणार नाही. अर्जाचं सबमिशन 18 तारखेचं आहे. त्यामुळे 18 किंवा 19 या तारखेचा कोणताही वाद नाही. लोकसभा अध्यक्षांनी सर्व गोष्टीची पूर्तता केली आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.
युती म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार
युती म्हणून लोकसभा लढवणार असल्याचे सांगत शेवाळे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच 2014 आणि 2019 साली आम्ही निवडणूक लढवली आहे. यावेळी मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. तसेच बाळासाहेबांच्या विचारांनाही कौल दिला आणि 2014 आणि 2019 साली लोकांनी विश्वास ठेवला. यानुसार, या आधीच्या निवडणुकीत आम्ही जे काही केलं तेच 2024 च्या निवडणुकीत करणार आहोत. युती म्हणूनच आम्ही नागरिकांकडे आशीर्वाद मागायला जाणार आहोत. 2014 आणि 2019 साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी आम्हाला जास्त मतं मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुहास कांदेंचे आव्हान आणि प्रत्युत्तर
एकीकडे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले असतानाच दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मनमाड मध्ये आल्यावर त्यांची भेट घेण्याची भाषा करणाऱ्या सुहास कांदे यांनी मनमाड मध्येच मेळावा घेऊन आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे परिवारावर टीका करणार नाही हे खरे पण आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारणाऱ्यांनी राष्ट्रवादीशी हात मिळवणी का केली?, याचे उत्तर द्यावे, असा टोला सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन लगावला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी असताना शिवसेनेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेत होते. इतकेच नाही तर आम्हाला भेटही देत नव्हते, असा आरोप सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App