विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराजांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर निवडणुकीत उभे राहायचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरात गादीचा वारस आणि दत्तक वाद पुन्हा एकदा उसळला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर सभेतून हा जुना वाद कसा होता आणि का होता??, याचा खुलासा केला. शाहू महाराजांनी देखील एक पत्र लिहून त्यावर आपली बाजू मांडली. Read the adoption controversy of kolhapur in 1962
त्यामुळे कोल्हापूरकरांबरोबरच महाराष्ट्रातल्या जनतेचा कोल्हापूर मधल्या वादाकडे लक्ष वेधले गेले. संजय मंडलिक यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे महाविकास आघाडीतले सगळे नेते खवळले. मराठी माध्यमांनी या मुद्द्याचा तोटा संजय मंडलिक यांना होईल, असा दावा केला. परंतु, संजय मंडलिक आपल्या मूळ वक्तव्यापासून बाजूला झाले नाहीत. उलट त्यांनी आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ 1962 च्या जन आंदोलनाचा हवाला दिला. त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आपणच कोल्हापूरच्या गादीचा खरा वारस असल्याचे सांगत पुढे आले. त्यामुळे देखील कोल्हापुरात शाहू महाराजांविषयी संशयाचे वातावरण तयार झाले, पण मूळात हा 1962 चा दत्तक वाद आणि त्याबद्दल आंदोलन हे प्रकरण आह तरी काय??, याची उत्सुकता निर्माण झाली.
त्याची कहाणी अशी :
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजे राजाराम महाराज. त्यांचे पुत्र शिवाजीराजे छत्रपती म्हणजे करवीरच्या गादीचे पहिले राजे. या पुढच्या वारशात नववे राजे म्हणजे शिवाजीराजे छत्रपती चौथे हे होते. त्यांना इंग्रजांनी कैद केले होते आणि कोठडीतच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यांना अपत्य नसल्याने कागलच्या घाटगे घराण्यातील मुलाला दत्तक घेतले, हेच ते कोल्हापूरचे कर्तृत्व संपन्न राजर्षी शाहू महाराज. पुढे राजर्षी शाहू महाराजांचे पूत्र राजाराम महाराज गादीवर बसले.
राजाराम महाराजांना ताराराजे आणि विजयमाला अशा दोन पत्नी होत्या. यापैकी ताराराजे यांना अपत्य नव्हते, तर विजयमालांना पद्माराजे म्हणून एक मुलगी होती. पण वारस म्हणून ताराराजे यांनी शहाजीराजेंना दत्तक घेतले. पुढे याच शहाजीराजेंनी आत्ताच्या शाहू महाराजांना नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक घेतले. त्यांचे मूळ नाव दिलीपसिंह. त्यावेळी पद्माराजे यांचे पुत्र म्हणजे राजवर्धन कदमबांडे यांना दत्तक घ्यावे, या बाजूने 1962 मध्ये कोल्हापुरात प्रचंड वाद उसळला होता. राजर्षी शाहू छत्रपती यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा छत्रपती शहाजी महाराज यांनी दत्तक घ्यावा, अशी जनभावना होती.
यासाठी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अवघे कोल्हापूर रस्त्यावर उतरले होते. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या अंतःकरणात या नाती विषयी ममत्व होते. याच भावनेतून आम जनता दत्तक प्रकरणी पद्माराजे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. सरकारी दडपशाही झाली तरी जनतेने त्यांची पर्वा केली नाही. तरीही शहाजी महाराज यांनी मुलीचे चिरंजीव दिलीपसिंह यांना दत्तक घेण्याच्या हालचाली चालवल्याने कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
कोल्हापुरात सायकल फेऱ्या निघाल्या. कोपरा सभा झाल्या. रात्री पेठा पेठांमधून मशाली मोर्चे निघाले होते. राजकीय पक्षांनी बिंदू चौकात सभा घेऊन पद्माराजे यांच्या मुलासच दत्तक घ्यावे अशी जाहीर मागणी केली. २४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेसवर मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी विरोध केल्यावर जनता खवळली. जोरदार दगडफेक झाली. पोलिस वायरलेस गाड्या जाळण्यात आल्या. लाठीमार, अश्रूधूरांचा वापर झाला. विशेष म्हणजे लोकांनी न्यू पॅलेस वर काळे निशाण लावले.
कोल्हापुरात पद्माराजे सहाय्यक समितीने कडकडीत हरताळ पाळला. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तरीही हे शाहू महाराजांचे दत्तकविधान झाले होते. हे वृत्त कोल्हापुरात वाऱ्यासारखे पसरले. त्यावेळी घराघरावर काळी निशाणे फडकावली, हरताळ पाळण्यात आला. शाळा कॉलेज बंद केली गेली. अनेक जहागीरदार आणि सरंजामदारानी या दत्तक विधानाचा निषेध केला होता. जनभावना एवढ्या संतप्त होत्या की शहाजी महाराज यांना सार्वजनिक ठिकाणी फिरणे मुश्किल झाले होते. या घटनेमुळे १९६२ ते १९८१ असा २० वर्षे येथील शाही दसरा सोहळा होऊ शकला नव्हता.
राजवर्धन कदमबांडे हे एकेकाळचे पवार समर्थक
राजवर्धन कदमबांडे यांच्या आजच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात उसळलेल्या जनआंदोलनाची आठवण कोल्हापूरकरांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ताजी झाली आज जरी राजवर्धन कदमबांडे हे भाजपचे नेते आणि धुळ्याचे माजी आमदार असले, तरी 1984 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इचलकरंजी मतदारसंघातून त्या वेळच्या शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेस मधून चरखा चिन्हावर काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ही आठवण देखील या निमित्ताने ताजी झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App