मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा…असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलरवर एक विशेष पोस्ट लिहून मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि मराठी भाषेबाबत मराठी माणसांनी कसं जागृत रहायला हवं हेही सांगितलं आहे. Raj Thackeray gave special wishes on Marathi language glory day said
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटल? –
सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.
मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.
पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी ह्या समाज माध्यमांवर सांगितली तर?
विकिमीडिया फाउंडेशनचं, ‘विकिपीडिया’ तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमिडीया फाउंडेशनच्या ‘विकिसोर्स’, ‘विकीमीडिया कॉमन्स’, ‘विकिव्हॉयेज’, ‘विकिस्पिशिज’ सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमिडीया सारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी. (विकिपीडिया हा ‘प्लॅटफॉर्म’ आहे पण त्याला ‘आभासी मंच’ शब्द वापरला आहे, असे पर्यायी शब्द पण प्रचलित व्हायला हवेत.)
मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच !
असं सांगत पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App