विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवर ईडीचे छापे घालताय ना तसेच छापे झोपडपट्ट्यांमधल्या मशिदी आणि मदरशांवर घाला, असे थेट आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहे. मनसेचा गुढीपाडवा सोहळा तब्बल दोन वर्षांनंतर शिवतीर्थावर झाला. या सोहळ्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वापासून महाराष्ट्राच्या विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले. ईडीच्या छाप्यांबद्दल देखील ते बोलले. मंत्र्यांवर छापे घालाच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमधील या मशिदी आणि मदरशांवर छापे घाला, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले. Raj Thackeray: ED raids on mosques and madrassas; Raj Thackeray appeals to PM
मुंबई आणि महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये मशिदी आणि मदरशांमध्ये कोणकोणती देशविरोधी कृत्ये सुरू आहेत आणि घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत अशा प्रखर शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
त्याच वेळी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारला केले आणि हे भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोरच त्या भोंग्यांच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा वाजवा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांमध्ये प्रचंड चैतन्य पसरले.
2019 च्या निवडणूक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी हिंदुत्वाच्या बाजूने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीला मतदान केले होते. परंतु या मतदारांशी गद्दारी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कारस्थान केले आणि सरकार बनवले. त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना धडा शिकवा, असा प्रखर हल्लाबोलही राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे शरद पवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर प्रखर हल्ला चढवला.
महाराष्ट्र जातीपातीच्या चिखलामध्ये शरद पवारांनी रुतवून ठेवला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. वेगवेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती मधली भांडणे शरद पवारांनी लावली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्याच वेळी कोण कुठला जेम्स लेन?, त्या नालायक माणसाने आमच्या जिजाऊमासाहेबांचा बद्दल वाटेल ते लिहिले त्याला फेकून देण्याऐवजी आम्ही तो जातीयवादाचा इतिहास उगाळत बसतो, अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला.
त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील समाचार घेतला. महाराष्ट्राच्या जनतेने हिंदुत्वाच्या नावावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीला मतदान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उघडपणे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे सांगत होते. मतदारांनी या युतीच्या बाजूने कौल दिला परंतु त्यानंतर अचानक उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आठवले आणि त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर कारस्थान करून मुख्यमंत्रिपद बळकावले. ही महाराष्ट्राच्या मतदारांची गद्दारी होती. ही गद्दारी आठवून त्यांच्या पक्षांना घरी बसवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
राज ठाकरे यांनी ईडीच्या छाप्यांवर देखील भाष्य केले. मुंबई महापालिकेत यांनी खा खा खाल्ले आणि जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणू लागले माझ्या कुटुंबाला हात लावण्यापेक्षा मला अटक करा. त्यांना आधीच नोटीस आली होती पण ते गेले नाहीत आणि आता ते कुटुंबाला हात लावण्यापेक्षा मला अटक करा असे सांगत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी आधी कुटुंबाला सांगावे की तुम्ही महापालिकेत जाऊ नका, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक फक्त महापौर बंगल्याच्या चौकटीत अडकवून नका. भव्य स्मारक बांधले बेस्टचे प्लॉट बिल्डरच्या घशात घालताना बाळासाहेबांचे स्मारक आठवले नाही, असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी केला.
ईडीच्या धाडी पडल्या पाहिजेत. पण त्या धाडी मदरशांवर घाला. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये मदरशांमध्ये काय भयानक गोष्टी चालतात हे पोलिसांकडून समजून घ्या. घातपाती कृत्यांसाठी आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही, इतक्या भयानक गोष्टी या मदरशांमध्ये चालत आहेत. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी या मदरशांवर आणि झोपडपट्ट्यांमधील या मशिदींवर धाडी घालाव्यात. जे सापडेल ते फार भयानक असेल. कारण पोलिसांना या सगळ्याची सूत्रे माहिती आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
त्याच वेळी मशिदींवरचे भोंगे उतरवा आणि जर भोंगे उतरले नाहीत तर त्याच्या दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App