नाशिक : महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी व्हावी आणि आपापल्या पक्षांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी दोन मोठ्या राजकीय हालचाली आज घडल्या. राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या दारी गेला, तर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड शरद पवारांना घरी जाऊन भेटून आले. दोन्ही ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने शेकाप आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दोन राजकीय घराण्यांचा आश्रय घेतला.
– शेकाप वर्धापन दिनात राज ठाकरेंचे मुख्य भाषण
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात कुठल्या शेतकरी नेत्याचे किंवा कामगार नेत्याचे मुख्य भाषण झाले नाही, तर ते मुख्य भाषण झाले मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे. उप भाषण झाले उद्धव सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचे. या दोन्ही नेत्यांनी ठाकरे बंधूंचा मराठीचा अजेंडा शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून पुढे रेटला. बाकी राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते पण शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनावर राज ठाकरे यांच्याच भाषणाची छाप राहिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना रायगड जिल्ह्यात अखंड शिवसेनेची टक्कर शेकापशीच असायची. दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष उडायचा. पण आता तो काळ इतिहासजमा होऊन दोन्ही पक्षांच्या राजकीय अस्तित्वाची भ्रांत तयार झाल्यामुळे शेकाप ठाकरे बंधूंच्या आश्रयाला गेला. मध्यंतरी जयंत पाटलांनी शरद पवारांचा आश्रय घेऊन पाहिला पण त्याचा लाभ त्यांना झाला नाही म्हणून मग त्यांनी दुसरा पर्याय म्हणून ठाकरे बंधूंशी संधान बांधले. त्याचेच पडसाद आज वर्धापन दिन कार्यक्रमात उमटले.
– प्रवीण गायकवाड पवारांच्या भेटीला
एकीकडे शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या आश्रयाला जात असताना दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. तिथे त्यांनी महाराष्ट्रातल्या सध्याच्या संघर्षाची माहिती पवारांना दिली. राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही संभाजी ब्रिगेड आता एक व्हाव्यात अशी इच्छा प्रवीण गायकवाड यांनी पवारांच्या भेटीनंतर व्यक्त केली. महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि सामाजिक दबाव तयार करण्यासाठी मराठा सेवा संघ अन्य संघटना निर्माण झाल्या पण ताकद विभागल्यामुळे आणि अनेक कारणांमुळे ना सामाजिक दबाव तयार झाला, ना राजकीय यश मिळाले म्हणून आता सर्वच बाबतीमध्ये फेरविचार करून दोन्ही संभाजी ब्रिगेड एक व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणारा असल्याचे प्रवीण गायकवाड म्हणाले. त्यासाठी त्यांनी पुरुषोत्तम खेडेकरांचा हवाला दिला.
प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फसल्यानंतर शरद पवारांनी त्यांना पोलीस संरक्षण घेण्याची सूचना केली होती. ती त्यांनी मान्य केली. फडणवीस सरकारने सध्या प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण दिले आहे. ते प्रदेशाध्यक्ष राहिले नाहीत, तरी संभाजी ब्रिगेडचे प्रमुख नेते म्हणून ते काम करत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पण हे सगळे त्यांनी त्यांनी शरद पवारांच्या भेटीगाठी नंतर पत्रकारांना सांगितले. याचा अर्थ संभाजी ब्रिगेडने शरद पवारांच्या संभाव्य राजकीय फेरमांडणीत विशिष्ट स्थान मिळवल्याचे मानले जात आहे.
– राजकीय घराण्यांचा आश्रय
शेतकरी कामगार पक्ष काय किंवा संभाजी ब्रिगेड काय या दोन्ही संघटनांचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व धोक्यात आल्यानंतर या संघटनांचे नेते महाराष्ट्रातल्या दोन राजकीय घराण्यांच्या आश्रयाला गेले, हेच आजच्या राजकीय हालचालींमधून स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App