विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल करून महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या पाठोपाठ केंद्रीय पातळीवर देखील मोठे फेरबदल केले. संघटनात्मक पातळीवर फेरबदल करून काँग्रेसला चांगले दिवस आणण्याचा पक्ष नेतृत्वाचा होरा आहे.
पण काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना बाजूला सारून नाव घ्या आणि चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची अचानक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती कशी झाली याची इनसाईड स्टोरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली. इंडियन एक्सप्रेसने त्या संदर्भात बातमी दिली. वास्तविक हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत नव्हतेच, कारण ते महाराष्ट्रातले सीनियर नेते नाहीत. त्यांनी राहुल गांधींबरोबर काम केले काँग्रेसशी ते निष्ठावान राहिले हे सगळे खरेच, पण त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत नव्हते.
काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु, मी माझ्या ऐवजी कुठल्या तरुण नेत्याला संधी मिळावी, असे पक्ष नेतृत्वाला कळविले होते. माझ्या अपेक्षेनुसार सतेज पाटील यांचे नाव समोर यायला हवे होते. कदाचित ते तसे आले देखील असेल, पण सतेज पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारला नकार दिला असेल. बहुतेक सीनियर नेत्यांनी नकार दिल्यानंतर पक्षाला दुसरा विचार करावा लागला असल्यास माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अर्थात हर्षवर्धन सपकाळ चांगले काम करतील. पक्षासाठी भरपूर वेळ देतील. कार्यकर्त्यांना भेटतील. त्यातून पक्ष उभा राहील परंतु सपकाळ यांच्यापुढे महाविकास आघाडीतल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या बरोबर वाटाघाटी करण्याचे आव्हान आहे, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
सतेज पाटलांनी देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पक्ष नेतृत्व स्वीकारण्यासाठी मला अनेक कॉल आले पण पुढच्या चार वर्षांसाठी पक्षाचे नेतृत्व करणे मला अवघड होते दोन वर्षे नेतृत्व करणे ठीक आहे. परंतु त्यापेक्षा जास्त काळ मला पद सांभाळणे शक्य नव्हते. हर्षवर्धन सपकाळ चांगले काम करतील. ते पक्षाला वेळ देतील कार्यकर्त्यांना भेटून पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करतील. भाजपमध्ये चंद्रकांत दादा पाटलांनी असे काम करून दाखविले याची आठवण सतेज पाटलांनी करून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App