विशेष प्रतिनिधी
सातारा : पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियलच नाही. ते इंटरनॅशनल मटेरियल आहे. त्यांना तुम्ही येथेच अडवून ठेवता, अशी उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. कराड दक्षिणचा फैसला झालाय. कराड दक्षिणमध्ये ‘हवाओंका रूख बदल चुका है’, असे सांगत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले कोणत्याही पदावर नाहीत. तरी देखील रस्त्यांसाठी ४७३ कोटी, ७७ कोटींच्या पाण्याच्या योजना, छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी ९६ कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही. अतुल भोसले यांचेसाठी आमचा पेन नॉनस्टॉप आहे. परंतु, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी फुटकी कवडी देखील दिली नसल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.
श्रेय घेण्याची पृथ्वीराजांची प्रवृत्ती
पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या विस्तारीकरण आणि हायवेवरील पुलांसाठी केंद्र सरकारने एकत्रित निधी दिलाय. परंतु, हायवेवरचा चार पदरी पूल आम्ही मंजूर केल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगतात. काहीही झाले तरी माझ्यामुळेच झाल्याचे सांगून श्रेय घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जो काम करतो, त्याला जनता श्रेय देत असते. मागायची गरज नसते, असेही फडणवीस म्हणाले.
सावत्र भाऊ मतांसाठी मार्केटमध्ये फिरताय
महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. परंतु, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही योजना फसवी आहे. पैसे मिळणारच नाहीत. हा राजकीय जुमला असल्याची टीका केली. तसेच कोर्टात धाव घेतली. तेच सावत्र भाऊ आज मत मागण्यासाठी मार्केटमध्ये फिरत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App