PMC Opinion Poll 2021 : पुणे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे आणि तिजोरीची चावी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हातीच दिली जावी, असे स्पष्ट करत पुणेकरांनी शहराचा कारभारी बदलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाला आणखी एक संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष भाजपला पर्याय म्हणून पात्र आहेत, असेही ठामपणे सांगितले आहे. जाणून घ्या, पुणेकरांच्या मनात नेमकं आहे तरी काय? PMC Opinion Poll 2021 Pune City Voters Wants To See BJP Again In Power, Read Details Here
पुणे : पुणे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे आणि तिजोरीची चावी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हातीच दिली जावी, असे स्पष्ट करत पुणेकरांनी शहराचा कारभारी बदलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाला आणखी एक संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष भाजपला पर्याय म्हणून पात्र आहेत, असेही ठामपणे सांगितले आहे.
आशय निर्मिती, निवडणूक धोरणनिश्चिती आणि सोशल मीडिया ब्रँडिंगच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस’ने घेतलेल्या ‘ओपिनियन पोल’मध्ये पुणेकर वेगवेगळ्या प्रश्नांवर मोकळेपणाने व्यक्त झाले आहेत. त्यामधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील मतदार (Pune Municipal Corporation Election 2021) या ‘ओपिनियन पोल’मध्ये सहभागी झाले होते. ‘गुगल फॉर्म्स’च्या साह्याने हा ‘ओपिनियन पोल’ घेण्यात आला. त्यात सहभागी होणाऱ्या पुणेकरांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. हा ‘ओपिनियन पोल’ पुण्यात मतदान करणारे मतदारच सहभागी होतील, याची विशेष काळजी घेण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून हा पोल पुणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
पुणे महापालिकेमध्ये भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी का, या प्रश्नावर उत्तर देताना सहभागी झालेल्या ६५ टक्के जणांनी होय असे उत्तर दिले. १८ टक्के मतदारांनी नाही, या पर्यायाला पसंती दिली असून, १७ टक्के लोकांनी आताच सांगणे कठीण असल्याचे म्हटले आहे. जर भाजप सत्तेमध्ये नसेल तर दुसरा कोणता पक्ष पुणे महापालिकेत सत्तेवर यावा, असे तुम्हाला वाटते, या प्रश्नावर उत्तर देताना सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहेत. ३६.६ टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय निवडला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी ‘राष्ट्रवादी’ खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (मनसे) विश्वास व्यक्त केला आहे. ३४.४ टक्के मतदारांना मनसे हा आश्वासक पर्याय वाटतो, असे दिसून आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिपब्लिकन पक्षाने पर्याय म्हणून महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळविली आहे.
गेल्या चार वर्षांतील पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभाराबद्दल सर्वाधिक म्हणजे १८ टक्के लोकांनी १० पैकी १० गुण दिले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील कोणते नेतृत्व आश्वासक वाटते, या प्रश्नावर सर्वाधिक नागरिकांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. धीरज घाटे हे दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, दोघांमधील अंतर लक्षणीय आहे. मोहोळ हे घाटे यांच्यापेक्षा दुपटीपेक्षाही अधिक संख्येने पुढे आहेत.
महापौरपदी असताना कोविड काळात मुरलीधर मोहोळ यांना केलेल्या कामाची पावती या निमित्ताने पुणेकरांनी दिली असल्याचे स्पष्ट होते आहे. कोविड काळात त्यांनी जनतेशी कायम ठेवलेला संवाद, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविलेली माहिती, महापौर जनसंवादसारखे राबविलेले वेगवेगळे उपक्रम, राज्य सरकारकडे तसेच पालकमंत्र्यांकडे पुण्यनगरीचे पहिले नागरिक म्हणून केलेला पाठपुरावा या सर्व गोष्टींसाठीची दाद मतदारांनी त्यांना दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच महापौर म्हणून मोहोळ यांची उज्ज्वल कारकीर्द लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्षाने त्यांना महापौरपदासाठी मुदतवाढ दिली होती.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पुणेकरांनी अजूनही स्वीकारले नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कोविड काळात चंद्रकांतदादांनी कोथरुड मतदारसंघात तसेच पक्षयंत्रणेच्या माध्यमातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. मात्र, तरीही त्यांना भविष्यातील आश्वासक नेतृत्वाच्या पर्यायांमध्ये सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक तिसऱ्या स्थानी, तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्षस्थान भूषविणारे हेमंत रासने चौथ्या, तर आमदार माधुरी मिसाळ पाचव्या क्रमांकावर आहेत. पुणे महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह नेते गणेश बिडकर हे आठव्या, तर शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक हे नवव्या स्थानावर आहेत.
सध्याच्या विरोधी पक्षांमधील कोणते नेतृत्व आश्वासक वाटते, या प्रश्नावर उत्तर देताना सर्वाधिक लोकांनी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची निवड केली. विरोधकांमध्ये काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक आबा बागूल यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती प्राप्त झाली आहे. पुणे महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक रवींद्र धंगेकर हे तिसऱ्या स्थानावर आहेत, तर काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना चौथ्या आणि शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांना पाचव्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना सहावी पसंती प्राप्त झाली आहे.
कागदावरची मेट्रो रस्त्यावर आणण्याचे काम गेल्या चार वर्षांच्या काळात झाले. फक्त चर्चेमध्ये असलेल्या मेट्रोचे काम दिसू लागले. मेट्रोच्या होत असलेल्या कामाला पुणेकरांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. त्या खालोखाल गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने आणि सत्ताधारी भाजपाने केलेल्या कामाला नागरिकांनी पसंती दिली. कोरोना संक्रमणरोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आला. रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले त्या सर्वांची चांगली दखल पुणेकरांनी घेतल्याचे दिसते आहे.
या कामांपाठोपाठ ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत शहरात झालेली कामे, चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठीचे प्रयत्न, पीएमपीएलच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस आणि पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवास तसेच पुण्याच्या पूर्व भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा-आसखेडचे पाणी आणण्याच्या कामालाही पुणेकरांनी पसंती दर्शविली आहे, हे सर्वेक्षणातून दिसून येते.
पुण्याच्या सर्व प्रभागातील नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत केलेले काम कसे वाटले, या प्रश्नावर उत्तर देताना सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के नागरिकांनी बरे हा पर्याय निवडला. एकूण २६ टक्के नागरिकांना काम चांगले वाटते तर २३ टक्के जणांना खूप चांगले वाटते. ८ टक्के नागरिकांनी गेल्या चार वर्षांतील काम एकदम वाईट असल्याचे म्हटले आहे.
कोणतीही निवडणूक आली की अनेक जण उमेदवारीसाठी पक्षांतर करतात. याबद्दल या सर्वेक्षणात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवारीसाठी पक्षांतर करणे एकदम चूक असल्याचे ५४ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. त्याचवेळी प्रभागात चांगले काम करणाऱ्या पण सातत्याने पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांबद्दलही सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी नापसंती व्यक्त केली. ४७ टक्के लोकांनी अशा ‘पक्षबदलू’ उमेदवारांना मत देणार नसल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मतदान करताना नगरसेवकाची पार्श्वभूमी आणि पक्षाची कामगिरी या दोन्ही गोष्टींचा विचार करतो, असे 53 टक्के नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
रोखठोक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला टोकदार शब्दांमध्ये खडे बोल सुनाविले आहेत. उत्तम स्थितीतील पदपथांवर दरवर्षी होणारा खर्च, चांगल्या दर्जाचे पेव्हर ब्लॉक्स बदलून नवीन टाकणे, अत्यंत दर्जाहीन पद्धतीने सुशोभीकरण करणे यावर नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी भाजपाच्या काळातही थांबलेली नाही, या बद्दल पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय नसल्या कारणाने वारंवार होणारी रस्तेखोदाई ही गोष्ट देखील पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर खटकते आहे. भाजपाला एकहाती सत्ता देऊनही ते काँग्रेस नि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वारसा पुढे नेत आहेत, अशा कानपिचक्या सर्वेक्षणात देण्यात आल्या आहेत.
आम्ही नरेंद्र मोदी आणि देवेंद् फडणवीस यांच्याकडे पाहून मत दिले. मात्र, स्थानिक नगरसेवक आमच्याशी संपर्क ठेवत नाहीत, अनेकदा उपलब्ध नसतात, अशी खंतही काही जणांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशीही तक्रार अनेकांनी केली आहे.
(टीप : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे सर्वेक्षण केले आहे.)
PMC Opinion Poll 2021 Pune City Voters Wants To See BJP Again In Power, Read Details Here
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App