विशेष प्रतिनिधी
पुणे : नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही वादाचा नव्हे, तर फक्त विकास कामांचा उल्लेख करीत फक्त त्याच मुद्द्यांवर भर दिला. PM Modi Pune Metro: Prime Minister Narendra Modi’s speech does not even notice the criticism of both Pawar; Just focus on development !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोचे काम अर्धवट झालेले असताना त्याचे उद्घाटन करणार आहेत. त्याच बरोबर मुळा-मुठा नदी सुधार योजनेत योजनेचे भूमिपूजन करणार आहेत. परंतु या नद्यांवर मोठी धरणे आहेत. नदी सुधार योजनेत नद्यांची पात्रे अरुंद झाली आणि उद्या ढगफुटी झाली तर त्याचा धोका भोवतालच्या गावांना असणार आहे. पंतप्रधान भूमिपूजन करून जातील पण काही धोका उत्पन्न झाला तर ते सगळे आपल्यालाच निस्तरावे लागणार आहे. याची मला चिंता आहे, अशा शब्दांमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले होते.
मात्र, शरद पवार यांच्या या कोणत्याच वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दखलही घेतली नाही. त्यांनी आपल्या भाषणाचा भर फक्त आणि फक्त विकासकामांच्या मुद्द्यांवर ठेवला होता. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात विशेषतः पुणे दौऱ्यात शरद पवारांची दखल घेत असतात. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे वक्तव्य ते शरद पवारांविषयी करत असतात. शरद पवारांकडे विकासाची दृष्टी आहे. त्याची स्तुती पंतप्रधान करत असतात. परंतु या वेळच्या पुणे दौऱ्यात एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा साधा उल्लेख देखील केला नाही. उलट मुळा-मुठा नदी सुधार योजना सारख्या योजना देशातल्या सर्व नद्यांच्या बाबतीत राबवल्या पाहिजेत त्यातून नद्यांना पुन्हा जिवंत करता येईल आणि आपली मोठी सांस्कृतिक विरासत जपता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्याच वेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकार या वादावर तसेच राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर देखील पंतप्रधानांनी कोणतेही वक्तव्य न करता फक्त विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला.
देशात मध्ये 60 टक्क्यांपर्यंत शहरीकरण होत असताना स्वच्छ ऊर्जा शहरांचा संतुलित विकास यावर भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर श्रीमंत लोकांनी केला पाहिजे, या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान राज्यपाल भगतसिंग यांचे नाव न घेता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधांबद्दल कथित स्वरूपातले वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याबद्दल तक्रार केली होती. परंतु या गोष्टीची पंतप्रधानांनी दखलही घेतली नाही.
पूर्वीच्या काळात विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात व्हायची पण विकास कामे वेळेत पूर्ण करणे आणि त्याचे उद्घाटन करणे याकडे मात्र दुर्लक्ष व्हायचे. आज काळ बदलला आहे. पुणे मेट्रोचे भूमिपूजन माझ्याच हस्ते झाले आणि उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. याचा अर्थ वेळेत काम करण्याची संस्कृती आता रुजते आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान मोदींनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या भाषणात माजी खासदार आणि जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी जागवल्या. रामभाऊ म्हाळगी यांची आज पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मला आठवण येते आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी बोलून दाखविल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App