पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या 2 दिवसांमध्ये 6 सभा महाराष्ट्रात झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आणि मराठी माध्यमांनी मोदींना एवढ्या सभा का घ्याव्या लागत आहेत??, ज्या अर्थी मोदींना 250 किलोमीटरच्या रेडियस मध्ये एवढ्या प्रमाणावर सभा घ्याव्या लागत आहेत, त्याचा नेमका अर्थ काय??, वगैरे सवाल उपस्थित केले आहेत. त्याचवेळी मराठा आरक्षणाचे म्होरके मनोज जरांगेंनी, तर त्याचे क्रेडिट स्वतःलाच घेऊन टाकले आहे. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून मोदींना महाराष्ट्रात येऊन भाजपला सावरावे लागत आहे. मोदींच्या सभा झाल्या नाहीत तर भाजपचा मोठा पराभव होईल याची भीती त्यांना वाटत आहे म्हणून मोदी जास्त सभा घेत आहेत, असा मनोज जरांगे यांनी दावा केला आहे. PM Modi on political rampage in maharashtra, but thackeray – pawar and Congress desultory
महाराष्ट्रातले विरोधक, मराठी माध्यमे आणि मनोज रंगले यांचे सगळे दावे एकाच दिशेने जात असले, तरी प्रत्यक्षात मोदींना महाराष्ट्रातल्या या जास्त सभांमधून नेमके काय साध्य करायचे आहे??, हे मात्र कोणी बोलायला तयार नाही. कारण ते त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणारे आहे. मोदी महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत जास्त सभा घेत आहेत, हे खरेच, पण याचा अर्थ असा की मोदींना अन्य कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा किंवा आंदोलनकर्त्यापेक्षा जमिनी स्तरावरच्या राजकीय परिस्थितीची आणि सामाजिक स्पंदनांची जाण अधिक आहे, हे मान्य करावे लागेल. महाराष्ट्रातले विरोधक मराठी माध्यमे आणि मनोज जरांगे यांचे सगळेच्या सगळे आर्ग्युमेंट जसेच्या तसे जरी मान्य केले, तरी आणखी एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे मोदी निवडणुकीच्या आधी जागे होऊन आपल्या प्रयत्नांचा जोर तरी वाढवू लागले आहेत. याचा अर्थ मोदींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची जाणीव झाली आहे.
मग या पार्श्वभूमीवर मूळातच पिछाडीवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांचे नेते प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करण्यापेक्षा भाषणबाजी करण्यातच मग्न असल्याचे दिसत नाही का?? पश्चिम महाराष्ट्रात मोदींच्या 250 किलोमीटर परिसरात जर 6 सभा होत असतील, तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते किती किलोमीटरच्या परिसरात किती सभा घेत आहेत??, याची साधी आकडेवारी जरी पाहिली, तरी मोदींच्या सभा आणि बाकीच्या नेत्यांच्या सभा यातली प्रचंड तफावत दिसून येईल.
“मोदींच्या सभांचा धडाका”, “पवारांच्या सभांचा धडाका” अशा हेडलाईन्स जरी मराठी माध्यमांनी छापल्या असल्या किंवा युट्युब वर टाकल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मोदींच्या सभा लोकसभा मतदारसंघांचे क्लस्टर बनवून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 3 लोकसभा मतदारसंघासाठी 1 सभा या प्रमाणात होत आहेत, त्या उलट शरद पवारांच्या एकाच लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 – 5 सभा झाल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे देखील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 किंवा 3 सभा घेत आहेत, मग अशा स्थितीत मोदींचा प्रभाव मोठा की पवार आणि ठाकरे यांचा प्रभाव मोठा??, हा साधा सवाल आहे.
महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होत असल्याचे सर्वे सांगत असल्याचे मराठी माध्यमांनी दावे केले. हे दावे क्षणभर खरे असल्याचे मान्य केले, तरी निदान ती पिछेहाट रोखण्यासाठी मोदींचे तळापासून महाराष्ट्र ढवळून काढण्याचे प्रयत्न तरी दिसत आहेत. त्याउलट पवार, ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते कोणते आणि किती प्रयत्न करतात आणि त्यांची त्या प्रयत्नांची झेप तरी किती मोठी आहे??, हा खरा सवाल आहे. पवारांच्या सभांचा धडाका बारामती आणि माढा या मतदारसंघाच्या पलीकडे तरी गेला आहे का?? उद्धव ठाकरे निदान मुंबई बाहेर पडून मराठवाडा आणि विदर्भात तरी गेले. ते सोलापुरात देखील आले, पण काँग्रेसचे कोणते स्टार प्रचारक त्यांचे – त्यांचे विभाग सोडून बाहेर पडले?? भारत जोडो यात्रा संपवून राहुल गांधी महाराष्ट्रात निघून गेल्यानंतर राहुल गांधींच्या महाराष्ट्रात किती सभा झाल्या?? प्रियाःका गांधी लातूर आणि नांदेड वगळून महाराष्ट्रात कुठे – कुठे फिरल्या??, याचाही नेमका हिशेब लावायला नको का??
त्यामुळे महाराष्ट्रात मोदींना जास्त सभा घ्याव्या लागल्याच्या दुगाण्या महाराष्ट्रातले विरोधक मराठी माध्यमे आणि मनोज जरांगे यांनी कितीही झोडल्या, तरी प्रत्यक्षात मोदींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची निश्चित जाण आली आणि त्यांनी आपल्या रणनीतीत बदल करून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले ही वस्तुस्थितीच अधोरेखित होते.
शिवाय मोदींनी आत्तापासूनच महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करावेसे का वाटले??, याकडेही थोडे बारकाईने बघितले पाहिजे. केवळ माध्यमांच्या सर्वेत महाराष्ट्राची परिस्थिती बिघडल्याचे दाखवले किंवा विरोधकांनी कुठले ढोल पिटले म्हणून मोदी आपली रणनीती बदलून महाराष्ट्रावर स्वारी करून आले, असे मत मराठी माध्यमांनी मांडणे हे आत्मवंचना करून घेण्यासारखे आहे. मोदींची नेमकी रणनीती मराठी माध्यमांना कळलीच नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे.
मोदींनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे ही बाब वरवरची किंवा केवळ टीका करण्यात इतपतच मर्यादित नाही. त्यापलीकडचे राजकारण साध्य करून घेणे हा मोदींच्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचा नेमका हेतू आहे, जो “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांच्या आकलना पलीकडचा आहे.
मोदींना महाराष्ट्रातला अस्थिरता घटक संपवायचा आहे
मोदींना आता महाराष्ट्रात स्थिरता आणायची आहे. पवार नावाचा अस्थिरता घटकच पूर्ण संपायचा आहे आणि यासाठी मोदी पक्के होमवर्क करून महाराष्ट्रात घुसले आहेत. त्यासाठीच त्यांनी काल पुण्याच्या सभेतून शरद पवारांवर आत्तापर्यंतची सर्वात प्रखर “भटकती आत्मा” अशी टीका करून घेतली. पण तिचे अपेक्षेबरहुकूम पडसाद महाराष्ट्रात उमटले नाहीत. ते पडसाद फक्त राष्ट्रवादीतच उमटले, ते देखील पवारांच्या राष्ट्रवादीतून उमटले. जयंत पाटील आणि रोहित पवारांनी मोदींना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी पवारांच्या बाजूने ना शिवसेनेचे नेते उभे राहिले, ना काँग्रेसचे नेते उभे राहिले!! अशा स्थितीत मोदींची पवारांवरची प्रखर टीका महाराष्ट्राने स्वीकारल्याची चिन्हे दिसली. कारण महाराष्ट्र ज्या पद्धतीने उसळून वर यायला हवा होता, तसं काही घडलंच नाही.
याचा अर्थ मोदींची रणनीती एका निश्चित दिशेने चालल्याचे ती निदर्शक आहे. मोदींना महाराष्ट्रात स्थिरता हवी आहे. त्यांना उत्तर प्रदेशात पाठोपाठ महाराष्ट्राचे नेमके राजकीय महत्त्व माहिती आहे आणि उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे त्यांनी योगी आदित्यनाथांना स्थिर करून दाखविले, त्या पद्धतीने महाराष्ट्रातले सरकार त्यांना स्थिर ठेवायचे आहे. योगी आदित्यनाथांसारखा राजकीय परफॉर्मन्स देणारा नेता मोदींना महाराष्ट्रात बसवायचा आहे. यासाठी मोदींचे होमवर्क पक्के करून ते महाराष्ट्रात घुसले आहेत. वडीलकीच्या नात्याने मोदी महाराष्ट्रातल्या महायुतीला आधार देत आहेत, त्या उलट फक्त 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करताना पवारांची दमछाक होते आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची दिशा वेगळी आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रचारात कुठे दिसेनासे झाले आहेत. फक्त “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना हे दिसत नाही इतकेच!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App