प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी क्रूजवरील ड्रग्ज पार्टीत महाराष्ट्रातले काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांना काशिफ खान याने निमंत्रण दिले असल्याचा दावा करत पंजाब मधल्या काँग्रेस सरकारवरच जणू शेरेबाजी केली आहे. कारण ड्रग्ज माफियांचा “उडता पंजाब” प्रमाणे “उडता महाराष्ट्र” करण्याचे षडयंत्र होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनाही क्रूज वरच्या ड्रग्ज पार्टीचे निमंत्रण होते. यासंदर्भात ते स्वत: अधिक माहिती देतील, असे सांगून मलिक यांनी या प्रकरणातला एक चेंडू अस्लम शेख यांच्या कोर्टात ढकलून दिला आहे.
या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये आर्यन खान केसमध्ये अस्लम शेख यांचे नाव आलेले नव्हते. ते नवाब मलिक यांनी आणले आहे. त्याच वेळी त्यांनी “उडता पंजाब” आणि “उडता महाराष्ट्र” असे शब्दप्रयोग वापरत पंजाब मध्ये आपल्याच मित्र पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे सरकार असल्याचे विसरून त्यावर शेरेबाजी केली आहे. अस्लम शेख यांचे नाव घेतल्यामुळे महाराष्ट्रातले आणखी एक मंत्री ड्रग्स प्रकरणात लपेट्यात आले आहेत.
तसेच नवाब मलिक यांनी अस्लम शेख यांचे नाव घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची नवी ठिणगी टाकल्याचे मानले जात आहे. अस्लम शेख हे मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांना पार्टीचे निमंत्रण काशिफ खान यांनी दिले होते ज्या पेपर मधून ड्रग्ज घेतले असे बोलले गेले तो एक फॅशन ब्रँड आहे. त्या फॅशन ब्रँडचा मालक काशिफ खान आहे. त्यानेच असलम शेख यांना ड्रग्ज पार्टीला बोलावले होते. ते जर पार्टीला गेले असते तर “उडता पंजाब” प्रमाणे “उडता महाराष्ट्र” झाला असता, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील याच्या संदर्भात देखील नवाब मलिक यांनी वेगळा दावा केला आहे. तो समीर वानखेडे यांच्या प्रायवेट आर्मीचा सदस्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुनील पाटील यांचा पत्रकार परिषदेच्या आधी तसेच नंतरही फोन आला होता. मी त्याला त्याच्या जवळची सगळी माहिती पोलिसांना सांगायला सांगितले. पण तो आला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे याप्रकरणात नाव नवाब मलिक यांनी घेतल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळा ट्विस्ट आला आहे. दरम्यानच्या काळात आर्यन खान केस तपास संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची दिल्लीची टीम करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App