नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सह महाराष्ट्रातल्या महापालिका अजित पवारांच्या पक्षाने महायुतीतून न लढता स्वतंत्रपणे लढाव्यात अशी सूचना केली. मात्र त्या सूचनेला अद्याप अजितदादांच्या राष्ट्रवादीतून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीने आक्रमक भाषण करून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढायची भाषा वापरली, ती भाषा पाहता महायुतीमध्ये अजित पवारांची राजकीय किंमत वाढण्यापेक्षा राजकीय किंमत घटण्याचीच त्यातून दाट शक्यता वाटू लागली आहे.
आपण मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवून भाजपला ताकद दाखवून द्यावी. आपण ताकद दाखवली तरच ते आपली किंमत ठेवतील, नाहीतर ते आपल्याला केव्हाही महायुतीतून बाहेर काढू शकतील. कारण भाजपकडे आपला पर्मनंट साथीदार नव्हे, अशी मुक्ताफळे नवाब मलिकांनी उधळली. मलिकांच्या सूचनेवर अजितदादांनी अद्याप निर्णय घेतला नसला तरी त्यांनी तसा निर्णय घेतला, तर त्याची “राजकीय किंमत” त्यांना चुकवावी लागेल हे निश्चित!!
कारण कुठल्याही युती किंवा आघाडीमध्ये सगळ्यात प्रबळ पक्षाने राजकीय परिस्थितीनुसार आक्रमक भाषा वापरून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करणे वेगळे आणि कुठल्यातरी दुसऱ्या पक्षाने तशीच भाषा वापरून स्वतंत्र लढाईची तयारी दाखविणे किंवा इशारा देणे निराळे.
आज अजित पवार ज्या महायुतीत सामील झालेत, त्यामध्ये भाजप नावाचा पक्ष एवढा प्रबळ बनला आहे की, त्या पक्षाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीत गरज उरलेली नाही. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या सत्तेच्या वळचणीची खरी गरज आहे. अन्यथा ते बाराच्या भावात जायला वेळ लागणार नाही. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी खालचे सत्तेचे जाजम काढून घेतले, तर त्यांची राष्ट्रवादी संघटनात्मक पातळीवर त्यांच्याकडेच टिकून राहील की नाही याविषयी दाट शंका आहे. कारण अजित पवार हे काही स्वतंत्र प्रतिभेने स्वतंत्र पक्ष चालविणारे नेते नव्हेत. ते नेहमी परावलंबी राहणारे नेतेच राहिले. हा इतिहास आणि वर्तमान आहे. भाजपचा टेकू नसता तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत 41 जागा मिळाल्या, ती संख्या तेवढ्यावर पोहोचली नसती. याची साधी जाणीव देखील नवाब मलिकांना नाही. कारण तसा विचार करण्याची विवेक बुद्धीच त्यांच्यापाशी उरलेली नाही.
नवाब मलिकांचा भाजपवर राग आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या संदर्भात कायद्याच्या कसोटीवर कठोर राजकीय भूमिका घेतल्याने त्यांची खरी पंचाईत झाली. त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले पण त्यामध्ये फडणवीस यांच्या कठोर भूमिकेपेक्षा खुद्द मलिकांचेच गुन्हेगारी प्रवृत्तीशी असलेले संबंध कारणीभूत ठरले.
– मलिक चौथ्या क्रमांकावर फेकले गेले
तरी देखील अजित पवारांनी त्यांना विधानसभेत शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. पण नवाब मलिक यांचे राजकीय कर्तृत्व एवढे तोकडे, की ते त्या निवडणुकीत थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. तरी देखील मलिक यांची महापालिका निवडणुका स्वतंत्र लढायची खुमखुमी गेली नाही. पण म्हणून लगेच अजित पवार मलिक यांच्या सूचनेनुसार तसा निर्णय घेण्याची देखील शक्यता फारशी दिसत नाही. किंबहुना महायुतीतील राजकीय परिस्थिती अशी आहे की, अजित पवार कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची क्षमताच राखत नाहीत. भाजपनेच त्यांना तसे सांगितले तर आणि तरच अजितदादा स्वतंत्रपणे निवडणुका लढवायचा निर्णय घेऊ शकतील.
मुंबई महापालिकेची गणिते तर पूर्ण वेगळीच आहेत, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे स्थानही नाही, पण त्या पलीकडे ज्या महापालिकेमध्ये अजित पवारांचा “खरा इंटरेस्ट” आहे, त्या पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील अजित पवार स्वतःच्या करिश्मावर सध्याच्या भाजपच्या पूर्ण वर्चस्वाच्या राजकीय परिस्थितीत स्वतंत्रपणे काही करण्याची शक्यता फारच धूसर आहे. उद्या जर खरंच अजित पवारांनी पुणे महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायचा निर्णय घेतला, तर ते त्यांना सर्वांत प्रबळ अशा भाजपला टक्कर द्यावी लागेल आणि ती त्यांच्यासाठी फार अवघड ठरणारी लढाई ठरेल.
– पुणे महापालिकेतही ताकद तोकडीच
राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाने सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसची टक्कर घेतली होती. त्यात त्यांनी काँग्रेसवर मात देखील केली होती. पण त्यावेळची काँग्रेस आणि त्यावेळची राष्ट्रवादी यांची राजकीय ताकद आणि परिस्थिती निराळी आणि आज फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रबळ भाजप यांची राजकीय ताकद आणि परिस्थिती निराळी, त्यामुळे जिथे अजितदादांनी पूर्वी “ताकद” दाखवून झाली आहे, त्या पुणे महापालिकेतच भाजपशी टक्कर घेण्याची अजितदादांची मारामार आहे. तिथे ते नवाब मलिकांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र लढायचा निर्णय घेणार हे म्हणजे कठीणच आहे!! त्यामुळे “दिव्य” ते नवाब मलिक आणि “धन्य” त्यांची सूचना!!, असे म्हणायची अजितदादांवर वेळ येऊ नये म्हणजे मिळवली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App