विशेष प्रतिनिधी
शिर्डी : Nawab Malik राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी भाषण करताना बीड प्रकरणावरून पक्षाला घरचा आहेर दिला. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणे पक्षाच्या हिताचे नसल्याचेही नवाब मलिक म्हणाले.Nawab Malik
बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवाय हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी पक्षाचा तालुकाध्यक्ष होता. आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. तसेच पक्षाकडून संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी शिर्डी येथील अधिवेशनात बोलताना उपरोक्त विधान केले.
काय म्हणाले नवाब मलिक?
राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे. परिणामी, आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणे हे पक्षाच्या हिताचे नाही. त्यामुळे या प्रकरणी पक्ष नेतृत्वांनी लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा, असे नवाब मलिक म्हणाले.
शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्वांना वेध लागले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’पार पडत आहे. यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कायकर्ते मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत.
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांकडे
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे वादात अडकलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी तसेच भाजपच्या विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांना डावलून बीडचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आले आहे. पुण्याच्या पालकमंत्रिपदाबरोबरच अजित पवार बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडणार आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सुरेश धस यांनी वेळोवेळी बाजू मांडताना बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंना देऊ नये अशी भूमिका घेतली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही बीडचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा धस यांनी अनेक मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App