विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या हाराकिरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा, असे ते आपल्या पत्रात म्हणाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.Nana Patole
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये या पराभवाची चिरफाड सुरू झाली आहे. त्यानुसार नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.
पदमुक्त करा, प्रदेश कमिटी बरखास्त करा
मी मागील 4 वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, असे नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याची विनंतीही आपल्या पत्राद्वारे केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना तूर्त पदावर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी पत्राद्वारे पदमुक्त करण्याची मागणी केल्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पराभवाची जबाबदारी पटोलेंचीच – वडेट्टीवार
दुसरीकडे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेतले होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावरच विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी येईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
पटोलेंचे ईव्हीएम विरोधी आंदोलनाला बळ
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधात रान पेटवले आहे. त्यासाठी स्वतः नाना पटोले माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाला गेले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची तयारी दर्शवली, तर मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास तयार आहे, अशी घोषणा केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App