विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन शहरांमधल्या वज्रमूठ सभा पार पडल्यानंतर आज 1 मे महाराष्ट्र दिन मुंबईत तिसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेवर मात्र आधीच्या दोन सभांवर नसलेले मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षांचे सावट येऊन पडले आहे. अर्थातच ते शिवसेना किंवा काँग्रेस या घटक पक्षांनी निर्माण केलेले नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केले आहे.MVA vajramooth sabha in Mumbai today under the shadow of ambitious chief ministerial candidates of NCP
नागपूरच्या झालेल्या वज्रमूठ सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षा उफाळून आल्या आणि अजितदादा पवार, जयंत पाटील यांच्या मुखातून त्या बाहेर आल्या आहेत. या महत्त्वाकांक्षांना वज्रमूठ सभेचे मुख्य वक्ते उद्धव ठाकरे कोणते आणि कसे वळण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आजच्या वज्रमूठ सभेचे मुख्य वक्ते आहेत. कारण या सभेच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. मुंबई – ठाणे परिसरात महाविकास आघाडीतील बाकीच्या घटक पक्षांपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे आयोजनाची जबाबदारी आदित्य ठाकरे आणि अनिल परब या दोन शिवसेना नेत्यांवर महाविकास आघाडीने दिली आहे त्यातही उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील की नाही याविषयी मतभेद आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतल्याही मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या आहेत.
महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकही मुख्यमंत्री झालेला नाही. किंबहुना पक्षाच्या उत्तुंग नेतृत्वाला महाराष्ट्रात स्वतःचा मुख्यमंत्री बसवणे जमलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. अर्थात ही जबाबदारी पार पाडणे हे सर्वस्वी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या इच्छेवर अवलंबून आहे.
भाजपला आणि शिंदे गटाला तीव्र विरोध म्हणून महाविकास आघाडी वज्रमूठ सभा घेत आहे. अर्थातच या सभेच्या सभांमधून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणे स्वाभाविक आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उफाळल्याने आघाडी टिकण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे आजच्या वज्रमूठ सभेत राष्ट्रवादीच्या महत्त्वाकांक्षाला कसे प्रत्युत्तर देणार?? त्या महत्त्वाकांक्षांना लगाम घालणार की त्या महत्त्वाकांक्षांचे वारू तसेच उधळू देणार??, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App