आदित्य ठाकरेंच्या नितीश कुमार – तेजस्वी यादवांशी भेटीगाठी; मुंबईतल्या उत्तर भारतीय मतांची बेगमी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता शिवसेनेने गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे वेगवेगळे राजकीय प्रयोग करत आहेत, त्या प्रयोगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बिहारची राजधानी पाटणामध्ये जाऊन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. Aditya Thackeray – Tejashwi Yadav – Nitish Kumar meet in Bihar

दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी या भेटीत कोणतेही राजकारण झाले नसल्याचा दावा करून आपण देशातल्या समस्यांवर चर्चा केली. संविधान धोक्यात आहे. युवक बेरोजगार आहे. त्याच्यासाठी एकत्र येऊन काय करता येईल याविषयी बोललो. पर्यावरणाच्या मुद्द्यावर चर्चा केली, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला तेजस्वी यादव यांनी दुजोरा दिला. तेजस्वी यादव या भेटीनंतर आदित्य यांना पाटणा विमानतळावर सोडायला गेले.

पण आदित्य ठाकरे यांचे बिहारमध्ये जाऊन नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना भेटणे ही काही सहज घडलेली राजकीय भेट नव्हे. या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महत्त्वाचा डावपेचही आहे. एकीकडे भाजप सारखा ताकदवान मित्र पक्ष गमावल्यानंतर शिवाय खुद्द स्वपक्षात प्रचंड मोठी फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्रात नवीन प्रयोग करतो आहे. यासाठी त्यांनी संभाजी ब्रिगेड आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेतले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मतांच्या टक्केवारीत प्रचंड मोठी घट सहन करावी लागत आहे. ही घट भरून काढण्यासाठी काही नवीन पर्याय तयार करता येतात का? याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा एक भाग महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याशी युती, तर दुसरा भाग म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची बेगमी करणे हा आहे. ही उत्तर भारतीयांची मतांची बेगमी करण्यासाठीच आदित्य ठाकरे यांनी नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

ज्यावेळी मुंबईसह 16 महापालिकांच्या आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रत्यक्ष जाहीर होतील, त्यावेळी कदाचित नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोन्हीही नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येऊ शकतील. हेच निमंत्रण देण्यासाठी तर आदित्य ठाकरे तिथे गेले नाहीत ना??, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.

बाकी आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर राहुल गांधींचीच भाषा समोर आली आहे. देशात संविधान वाचवायला पाहिजे. युवकांची बेरोजगारी मिटवायला पाहिजे. त्यांना रोजगार दिले पाहिजेत, अशी भाषा दररोज राहुल गांधी भारत जोडो यात्रेत बोलत असतात. तीच भाषा आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव या नेत्यांनी पाटण्याच्या भेटीनंतर वापरली आहे. पण प्रत्यक्षात मात्र ही भेट मुंबई महापालिका निवडणुकीशी आणि उत्तर भारतीयांच्या मतांशी जोडली जात आहे.

Aditya Thackeray – Tejashwi Yadav – Nitish Kumar meet in Bihar

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण