प्रतिनिधी
मुंबई : आतापर्यंत संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केले आहेत. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत 29 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. तसेच या कंपनीशी आपले संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. Money laundering of Rs 29 crore in Shridhar Patankar’s company
कोट्यवधींचे मनी लाँड्रिंग
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ‘श्रीजी होम्स’ ही एक रिएल इस्टेट कंपनी आहे. त्यांनी शिवाजी पार्कला करोडो रुपयांची मोठी इमारत उभी केली आहे. 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपयांचे काळे धन मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून यात वापरण्यात आले आहेत. या कंपनीला चालवणारे पार्टनर तुमचे मेव्हणे आहेत आणि दुसरे दोन पार्टनर प्रा. लि. कंपन्या आहेत. त्यामुळे या कंपनीशी तुमचे काय संबंध आहेत हे उद्धव ठाकरे यांनी सांगावं, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
चतुर्वेदींना कुठे लपवलेत?
आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. फरार असलेल्या चतुर्वेदी यांचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. चतुर्वेदी यांनी करोडो रुपयांचे मनी लाँड्रिंग केले आहे. ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करुन लुटलेला पैसा पार्क करण्याचे काम केले आहे. त्यामुळे या नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवले आहे, असा सवाल सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. याचवेळी त्यांनी चतुर्वेदी यांच्या कंपन्यांची यादी देखील सादर केली आहे. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या 3 कंपन्या आहेत, त्यामुळे ठाकरे परिवार नंदकिशोर चतुर्वेदींचा वापर करत आहे का, असा गंभीर सवालही त्यांनी केला आहे.
प्रवीण कलमे कुठे आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणारे प्रवीण कलमे यांच्याबद्दल काही खुलासे केले होते. यांनी माझ्याबद्दल अनेक तक्रारी केल्या, उच्च न्यायालयात अनेक आरोप केले. हा प्रवीण कलमे आज कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. एसआरएच्या सरकारी कार्यालयातून लपून कागद चोरताना त्यांना पकडण्यात आले आहे. एसआरएच्या मुख्य अधिका-यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात अजून का कारवाई होत नाही, ते कुठे गेले आहेत याचा शोध का घेण्यात येत नाही. कलमे हे देश सोडून पळाले आहेत. त्यांना पळून जायला कोणी मदत केली, असा सवालही त्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App