विशेष प्रतिनिधी
Ajit Pawar बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी काल अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार केलेली मिमिक्री चांगलीच गाजत आहे. या भाषणात शरद पवारांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला .Ajit Pawar
इंदापूर येथील सभेत अजित पवार यांनी चष्मा काढत डोळे पुसत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचा संदर्भ देत पवारांनी एक शब्दही न बोलता त्यांची नक्कल केली. पवार म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळेला सुनेत्रा उभ्या होत्या. भाषण काय होती नेत्यांची? भाषणं होती की साहेब येतील भावनाप्रधान बोलतील, भावनेला हात घालतील. भावनाप्रधान होऊ नका. साहेब येतील डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या म्हणून सांगतील. चांगलं आहे माझ्यासाठी सल्ला दिला, असे सांगत पवार म्हणाले कालच्या सभेमध्ये आणि त्यांनी अजितदादांची नक्कल केली.
अजित पवारांचा समाचार घेताना ते म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तुम्ही निवडणुका अनेक वेळेला बारामतीच्या बघितल्या आहेत. माझ्या बघितल्यात, सुप्रियाच्या बघितल्यात, अजितदादांच्या बघितल्यात आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हा सर्वांची साथ होती. या निवडणुका आम्ही आत्तापर्यंत केल्या त्या काही विचारातून केल्या, पक्षातून केल्या. तुम्ही लोकांनी साथ दिली, महाराष्ट्राने साथ दिली. निवडणुका घ्यायला एकट्याची असेल तर अपक्ष आणि राज्याचे काही कारभार करायचे असेल तर पक्ष याची खूण असते. आता जशी युगेंद्रची खूण आहे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ तशा खुणा असतात. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे आम्ही लोकांनी पक्ष काढला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ तुम्ही लोकांनी साथ दिली. अनेक वर्षे लोक निवडून गेले, महाराष्ट्राचं राज्य सुधारलं. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि या पक्षाला मदत झाल्याने चित्र बदललं. पक्ष स्थापन कोणी केला? हा जो पक्ष आहे तो कोणी काढला? पक्ष काढला मी, खूण कोणाची होती? एक दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला केला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला की पक्षाचे मालक हे नाहीत, आम्हीच आहोत. ही खुण त्यांची नाही ती आमचीच आहे. केस झाली दिल्लीला तिथे दिल्लीच्या कोर्टात त्याची सुनावणी झाली. ज्यांनी केस केली त्यांनी एक नंबर त्यांच्यावर कोण मुख्य माणूस ज्याच्यावर आमची केस आहे म्हणून त्याला समन्स काढलं. एक नंबरचं समन्स त्या समन्सचे नाव शरद गोविंदराव पवार! हे समन्स माझ्यावर काढलं की कोर्टात तुम्ही हजर रहा. कोर्टाचे समन्स, इलेक्शन कमिशनचे समन्स. इलेक्शन कमिशन ही कोर्टाची यंत्रणा आहे. समन्सला हजर राहावं लागतं. समन्स कधी पाहिलं नव्हतं पण गेलो कोर्टात, राहिलो उभा तिथे. दिवस दिवसभर खटला चालू दिवस दिवसभर त्या ठिकाणी उभा करण्याच्या संबंधीचे काम केलं. तक्रार माझ्या विरोधात, तक्रार कोणाची? चिरंजीवांची. दोन नावं, दोन्ही पवार. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं पण ती केस करून मला त्या ठिकाणी खेचलं गेलं. केंद्र सरकार त्यांच्या हातात त्या सरकारमध्ये काय चक्र फिरवली माहीत नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे आहे शरद पवारांचे काही संबंध नाही. मोठ्या गमतीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं. पक्षच पळवला, खूण पळवली. एवढेच करून थांबले नाहीत आणि तुम्हा लोकांना विनंती केली महाराष्ट्राला विनंती केली की आमचे आमदार निवडून द्या. महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला आणि महाराष्ट्राचे राज्य आम्हा लोकांच्या विचारांच्या लोकांच्या हातात दिलं. मी त्या राज्यात कधी नव्हतो.
पवार म्हणाले, खूपदा मंत्री तुम्ही मला केलं, चारदा मुख्यमंत्री काय साधी गोष्ट आहे? देशाचा संरक्षण मंत्री, दहा वर्ष शेती मंत्री आणखी काय द्यायचं लोकांनी? म्हणून निकाल घेतला लोकांच्यात राहायचं पण मंत्री पदाची अपेक्षा करायची नाही. मग सरकार विरोधात आणि जवळपास तीन वेळेला सबंध सरकार आम्हा लोकांच्या विचारांचं होतं. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं? प्रश्न माझ्यापुढे होता आम्ही चर्चा करायचो. चार वेळेला उपमुख्यमंत्री बारामतीचा! एकदा नाही चारदा. आपल्या पक्षाचं पाचव्यांदा पहिल्यांदा भाजपवाल्यांची मदत घेतली. काय कारण होतं? भाजपवाल्यांनी मतं दिली? कालची लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली पाच वर्षांपूर्वीची त्यावेळेला भाजपवाल्यांनी मतं दिली नव्हती. मत तुम्ही दिली होती, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिली होती. मग असे असताना त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतलं? लोकशाहीमध्ये पद लागतं लोकांची सेवा करायला. पण लोकांची साथ त्याच्यामध्ये कमी असली तर आपली चूक काय झाली याचा विचार करून सुधारणा करून लोकांचा विश्वास संपादित करायचा असतो. मी अनेक वेळेला विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेकदा सत्ता माझ्या हातात नव्हती. त्यामुळे लोकांची साथ कधी सोडली नाही त्यामुळे लोकांनी पुन्हा संधी मिळेल त्या वेळेला मदत करण्याची भूमिका घेतली.
अजित दादांच्या विकासाच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, आज सांगितलं जातं बारामतीचा विकास! विकास हा सगळ्यांच्या मदतीने होतो. माझा हातभार असेल, अजितदादांचा हातभार असेल आणखी कोणा कोणाचा असेल सगळ्यांच्या प्रयत्नांनी विकास होत असतो. त्याचा आनंद आहे. विरोधकांनी विकास केला तर त्याला चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे. अनेक संस्था आपण सुरू केल्या. देश पातळीवर त्याचे नाव लौकिक आहे. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तुम्हाला राज्यात प्रगती करायची असेल तर त्यांनी शब्द वापरला बारामती पॅटर्न! बारामती पद्धत ही स्वीकारा त्यामुळे तुमचे राज्य प्रगतीच्या पथावर जाईल या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. मी राज्य चालवायची जबाबदारी सोडली, मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली. सगळा कारभार नव्या पिढीच्या हातामध्ये दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा अध्यक्ष मी होतो मान्य आहे पण त्याच्यातून उभी झालेली कारखानदारी, अधिकार हा नव्या पिढीला दिला. नव्या पिढीला दिल्यानंतर राजकारणात कधी यश येतं कधी अपयश येतं कधी सत्ता असते कधी नसते. सत्ता नाही म्हणून आपले सहकारी आहेत त्यांची साथ सोडायची नसते. दुर्दैवाने सत्ता नसताना आमच्या काही सहकाऱ्यांनी उद्योग केला. पहाटेच उठले आणि पहाटे उठून शपथ घेतली मोठ्या गमतीची गोष्ट आहे. साडेपाच वाजता सहा वाजता शपथ? त्या गव्हर्नरला झोपेतून उठवलं आणि सहा वाजता शपथ त्या ठिकाणी घेतली. कशासाठी? आपला विचार सोडला आणि शपथ घेतली. परिणाम काय झाला? चार दिवस टिकलं राज्य, चार दिवसांपेक्षा जास्त नाही. पण ही गोष्ट करणे योग्य नाही ही भावना जनतेच्या मनात झाली आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या कामांमध्ये वेगवेगळ्या आणि इथे ज्यांच्या हातात सगळं काम दिलं त्यांनी एक दिवशी पक्षच घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले. पण त्याच्या आधी चार वेळेला ते पद मिळालं होतं ना? चार वेळेला तुम्हाला पद मिळालं एखाद्याला नाही मिळाला तर घर फोडायचं असतं? असं सांगण्यात आलं की घर मी फोडलं.
अजित पवारांनी शरद पवारांवर घर फोडण्याचा आरोप केला होता त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, मोठी गमतीची गोष्ट आहे घर फोडायचं काही कारण नाही मी घरातला पवार कुटुंबातला वडीलधारा मी आहे आणि आज पर्यंत सगळे माझे ऐकतही होते मी काही त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही इथून पुढे कोणी कशीही भूमिका घेतली तर मी कधी चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. कुटुंब एक कसे राहील? याची मी काळजी घेईन. हा माझा स्वभाव आहे मला काही दुसरं करायचं नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती, मर्यादा होती अनेक पद द्यायचा मला अधिकार आहे, होता. कोणाला मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, अनेक पद दिली एक पद सुप्रियाला दिलं का? कधी एक पद सुप्रियाला दिलं नाही. बाकीच्यांना पद दिली स्वतःच्या मुलीला कधी पद दिलं नाही आणि तिनेही कधी मागितलं नाही. ठीक आहे बाकीच्यांना द्या आणि ह्याच पद्धतीने केलं. आज त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि हे करत असताना घर एकत्र ठेवलं पाहिजे याच्याबद्दल कधी दुसरा विचार मनात आलेला नाही. अधिकार दिले सगळे तुम्ही सांगा इथले काही पदाधिकारी जुने गेल्या वीस वर्षांत छत्रपती साखर कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, दूध संघ, खरेदी विक्री संघ कुठे मी कधी एक माणूस निवडला? सगळे अधिकार मी कुणाला कुठे नेमणार याची चर्चा सुद्धा केली नाही. सगळ्या संस्थांचे अधिकार हे त्यांना दिले माझे फक्त लक्ष शिक्षणावर होते आणि शेतीकडे बाकी कुठेही लक्ष दिले नाही. सगळ्या संस्था या हातामध्ये दिल्या. आज इतक्या वर्षांच्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना ही स्थिती का व्हावी? म्हणून मला काल भाषणात जे सांगण्यात आलं की घर फोडलं घर फोडण्याचा पाप माझ्या आई-वडिलांनी माझ्या भावांनी मला कधीही शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे अनंतरावांच्या सह माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घराचा संसार बघितला नाही शेती बघितली नाही सगळी यांनी बघितली आणि मी गावभर हिंडत बसलो. राजकारण करत बसलो देशाच्या पातळीवर करत बसलो का? या सगळ्या भावांचा आशीर्वाद माझ्या मागे होता त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. त्यामुळे ते भाऊ किंवा त्यांची मुलं बाळ यांच्यात माझ्यापासून कधी अंतर येणार नाही ही माझी भूमिका राहील. कुणी कशी मतं घेतली कशी भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्याकडून कुठल्याही प्रकारची भूमिका होणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App