विशेष प्रतिनिधी
जालना : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणूक कालच संपली. आता हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. मराठा समाजाने आता आपल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागावे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्या समाजाला निवडणूक डोक्यातून काढून टाकण्याचाही सल्ला दिला.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एका टप्प्यात निवडणूक झाली. आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
आता पुढची जबाबदारी मराठ्यांची
मनोज जरांगे गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात पत्रकाराने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज व्यक्त करण्याची विनंती केली. त्यावर ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या मैदानात नाही. माझा समाजही नाही. त्यामुळे मी कसा अंदाज सांगू शकतो? आम्ही मैदानात असतो तर हा अंदाज सांगता आला असता. शेवटी या राज्यात मराठा समाजाच्या मतांशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे आता येथून पुढची जबाबदारी मराठ्यांची आहे.
आता आमच्यासाठी निवडणूक व प्रचाराचा मुद्दा संपला आहे. आता त्याला पुन्हा पुन्हा गिरवण्यात मजा नाही. मराठ्यांनी आता आपल्या डोक्यातून राजकारणाचा विषय काढून टाकला आहे. पुढे होईल ते होईल. पण आता आमच्या डोक्यात आमच्या आयुष्याचा, भविष्याचा व लेकराबाळांचा विषय आहे. मतदान संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आमच्या आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे.
आम्ही आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्याची तयारी करायची आहे. सर्वांनी आपापल्या शेतातील कामे उरकून इकडे आंतरवाली सराटीत यावे. सरकार स्थापन झाले की या उपोषणाची तारीख घोषित केली जाईल, असे मनोज जरांगे म्हणाले.
नव्या सरकारला 8 दिवसांचा अवधी देणार
उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी 2 दिवसांपूर्वी दिव्य मराठीशी बोलताना राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर 8 दिवसांनी आंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले होते.
विधानसभा निवडणुकीत सत्ता कुणाचीही आली तरी आरक्षणासाठी मला लढा द्यावाच लागेल. नवे मंत्री झालेल्यांना 8 दिवस आनंद घेऊ देणार. त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. आंतरवाली सराटीमध्ये जिकडे जागा मिळेल तिकडे उपोषण करण्यात येईल. जागा नसेल तर प्रसंगी आंदोलक रस्त्यावर बसतील. एका उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली तर दोन डॉक्टरची गरज असते, जर 1 लाख उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली तर? इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आहेत काय? कोण कुठे उपोषणाला बसणार हेही प्रशासनाला कळणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App