विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.Manoj Jarange
संतोष भैय्याला न्याय मिळाल्या शिवाय आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मागून एक इंच सुद्धा मागे हटणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असून सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी देखील आपण आहोत. असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉन्ग मार्च मुंबईकडे जाणार आहे. हा लॉन्ग मार्च ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याने लागणाऱ्या सर्व गावातून त्यांच्या नष्ट्याची सोय करून देण्यात यावी अशी मी विनंती करतो. आता आरोपींना अटक झाली आहे. एक जण राहिला आहे, त्याचा शोधही लागेलच. ही एक मोठी साखळी आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कुठल्या सरकारने देखील असे नेटवर्क पहिले नसेल. या नेटवर्कने आपल्या संतोष भैय्याचा जीव घेतला आहे.
या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या टीम आहेत. खंडणी मागायला वेगळी, अपहरण करायला वेगळी. बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, चोरी करणारी वेगळी टीम, आणि या सर्वांना सांभाळणारा एक जण आहे. ज्याने खंडणी मागायला पाठवले तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, ज्याने खून करणाऱ्याला पाठवले तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, तो आधी जेलमध्ये गेला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्या दिवशी आम्हाला असे वाटेल की या आरोपीमधून एकही आरोपी सुटणार आहे, त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरणार हे मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावे. सूर्यवंशी कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. कोण कसा डाव टाकत आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, यांना कुठलीही चाल आपण खेळू द्यायची नाही. राजकारण ही राजकारणाच्या ठिकाणी असते, ज्या वेळेस एक लेक टाहो फोडते, ज्या वेळेस एक भाऊ न्यायासाठी वणवण फिरतो त्यावेळेस समाजाने त्यांच्या पाठीशी उभे असणे गरजेचे आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही तुमच्या टोळ्या जर रास्ता रोको करत असतील, आंदोलन करत असतील तर राज्यात वेगळा पायंडा पडत आहे. आजपर्यंत या राज्यात मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीने आरोपीच्या बाजूने कधीच आंदोलन केलेले मला तरी आठवत नाही. या राज्यात आणि या लोकांवर संस्कार आहेत त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत. धनंजय मुंडेच्या टोळीने मोर्चे काढायला सुरू केले आहेत. कोण जातीवाद करत आहे दाखवून द्या. एकदा समोर येऊन दाखवा कोण जातीवाद करत आहे. आम्ही कधी वंजारीला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही. पण जे टोळी चुकीचे काम करायला लागली त्यांना काही बोलायचे नाही का? असाच नंगा नाच करू द्यायचा का? असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडेच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची, त्यांच्या जिल्ह्यात पत होती, मानसन्मान होता, हे सगळा धनंजय मुंडेच्या टोळीने मातीत मिसळला आहे. कोणी जातीवाद करत नाही. टोळीच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. जर ते मस्तीतच राहणार असतील तर अवघड विषय होईल, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App