विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावोगावच्या बैठका थांबवल्या आहेत, त्यामुळे त्यांनी 23 मेपूर्वी चर्चेला यावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या आवडी-निवडीचा कोणताही मंत्री सरकारमध्ये नाही. अनेक मंत्री रोज बोलत असतात, पण आम्ही कोणालाही चर्चेसाठी बोलावत नाही. प्रसाद लाड यांचे शब्द खरे वाटल्यानेच त्यांना आमंत्रित केले आहे. सरकार एखाद्या आमदाराच्या माध्यमातून काय डाव टाकेल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. मला कोणाबद्दलही आकस किंवा द्वेषभावना नाही, पण माझ्या समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर मी कोणाला सोडणार नाही.Manoj Jarange
श्रेय तुम्हीच घ्या, पण लेकरांचे भले करा
आरक्षणाच्या मागण्यांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला राजकारण करायचे नाही, तर माझ्या समाजाच्या लेकरांचे भले करायचे आहे. हैदराबाद गॅझेट (GR) चे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे आहे, ते त्यांनी खुशाल घ्यावे. आताच्या मागण्यांचे श्रेयही सरकारनेच घ्यावे, आमची काहीच हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, म्हणजे आम्हाला आंदोलन करण्याची गरजच उरणार नाही.
मनोज जरांगे म्हणाले की, प्रसाद लाड चर्चेला येणार म्हणून आम्ही काही दिवस थांबलो आहोत. जर ते आले नाहीत, तर ऐनवेळी आंदोलनाची तयारी करायला कमी दिवस मिळतील. त्यामुळे 30 मे रोजी होणारे आंदोलन आम्ही अजिबात थांबवणार नाही. हे आंदोलन कोणत्याही द्वेषातून नसून मुलांच्या हक्कासाठी आहे.
मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही
आपल्या भूमिकेविषयी समाजात कोणताही संभ्रम राहू नये यासाठी स्पष्टीकरण देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस अशा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आहे, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. मी केवळ एक आंदोलक आहे आणि माझ्या समाजाच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहे. जर मुख्यमंत्री आमच्या सर्व मागण्या 100 टक्के मान्य करणार असतील, तर आम्हाला उगाच आंदोलन करण्याची कोणतीही हौस नाही. आम्ही सरकारविरोधात लढत आहोत, कारण मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सरकारविरोधातच लढावे लागते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App