विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vidhan Parishad Election Results: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग, बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांनी निकालांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसून आले.Vidhan Parishad Election Results:
नाशिकमध्ये भाजप बंडखोराची बाजी, महायुतीला मोठा धक्का
नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अनपेक्षित पराभव झाला. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या गोकुळ गिते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजय मिळवला. महायुतीकडे संख्याबळ असूनही अंतर्गत नाराजी आणि क्रॉस व्होटिंगमुळे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्याची चर्चा आहे.Vidhan Parishad Election Results:
धाराशिव-लातूर-बीडमध्ये ओमराजेंची खेळी, काँग्रेसचा भोपळा
धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी मोठा विजय मिळवला. या निकालामागे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात मते फुटल्याने काँग्रेसचे महेश देशमुख अवघ्या 124 मतांवर थांबले.
सांगली-साताऱ्यात विजय महायुतीचा, पण शंभर मतांची गळती
सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. मात्र विजय मिळूनही महायुतीची जवळपास 100 मते फुटल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक मतभेद यामागे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.
संभाजीनगरमध्ये भाजपचा ‘ओबीसी फॉर्म्युला’ यशस्वी
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ यांनी 455 मते मिळवत विजय संपादन केला. शिवसेना ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना केवळ 135 मतांवर समाधान मानावे लागले. ओबीसी समाजातील नेतृत्वाला संधी देण्याचा महायुतीचा प्रयोग येथे यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
नांदेडमध्ये भाजपचा इतिहास, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाची चर्चा
नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी विजयाची हॅटट्रिक करत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच मोठे यश मिळाल्याने या विजयाचे श्रेय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले जात आहे.
सोलापुरात महायुतीचा दबदबा, विरोधकांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा
सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नियोजनामुळे हा विजय शक्य झाल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे काही विरोधी गटांमधील स्थानिक नेत्यांनीही भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
नागपुरात काँग्रेसची मते फुटली, भाजपचा विक्रमी विजय
नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी तब्बल 682 मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसचे अतुल लोंढे यांना पक्षाच्या अपेक्षित मतांपेक्षाही कमी मते मिळाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत फूट पुन्हा उघड झाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रणनीतीचीही चर्चा रंगली.
भंडारा-गोंदियात विजय महायुतीचा, पण चर्चेत क्रॉस व्होटिंग
भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले. मात्र निकालापेक्षा महायुतीतील 35 हून अधिक मतदारांनी केलेल्या कथित क्रॉस व्होटिंगची चर्चा अधिक रंगली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नाराजी उघड झाल्याचे मानले जात आहे.
अमरावतीत काँग्रेसचा पूर्णतः सफाया
अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी 390 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. उमेदवार निवडीवरून निर्माण झालेली नाराजी, स्थानिक नेत्यांचा विरोध आणि संघटनात्मक गोंधळ याचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसले.
महायुतीचा स्पष्ट संदेश, महाविकास आघाडीसाठी इशारा
या निवडणुकीच्या निकालातून महायुतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला अनेक मतदारसंघांत अंतर्गत मतभेद, बंडखोरी आणि संघटनात्मक कमकुवतपणाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल
1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप
4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप
6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
सहा उमेदवार बिनविरोध
12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
Vidhan Parishad Election Results: Mahayuti Wins Big Amid MVA Cross-Voting Crisis
महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश; सर्वांना धनुष्यबाणावर निवडून आणायचे शिंदेंचे आश्वासन!!
- नाशिक मध्ये फुटली तब्बल 218 मते; नरेंद्र दराडे यांच्या पराभवात भाजप बरोबर राष्ट्रवादीचाही हात!!
- Trump : ट्रम्प म्हणाले– इराणने हिजबुल्लाहला थांबवावे, अन्यथा पुन्हा हल्ला करू:अमेरिका-इराण यांच्यात 82 मिनिटे चर्चा
- Mumbai BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; शिंदेंची मोठी घोषणा, वेतनवाढीसह ग्रॅच्युईटीचा मार्ग मोकळा