मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.