महविकास आघाडीचा राज्यातील कारभार ते राज्यपाल यांचे वादग्रस्त वक्तव्य याच्यावर मनसे नेते राज ठाकरे यांची जोरदार टोलेबाजी
विशेष प्रतिनिधी
पुणे -राज्य सरकारकडून निवडणुका लांबणीवर पडण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे कारण पुढे केले जात असले, तरी ते पूर्णपणे खोटे आहे. मुळात सरकारला निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या. मुख्यमंत्र्यांची तब्येत हेच निवडणुका पुढे जाण्याचे खरे कारण आहे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सरकारवर निशाणा साधला. या राज्यपालांना काही समजच नाही. कळत नसेल, तर बोलयाचे कशाला, असा सवाल करतानाच सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण वीट आणणारे असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. Maharashtra Navanirman Sena 16th Anniversary program organised in Pune
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर तसेच अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील मनसैनिकांनीही या वेळी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.
राज म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष लोकांना जातीपातीमध्ये गुंतवून ठेवत आहेत. परवा आमचे राज्यपाल काही तरी बरळले. समज वगैरे काही आहे का त्यांना? मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो, तेव्हाच काय ते लक्षात आले. या राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्याबद्दल काही माहीत आहे का? आपला काही अभ्यास नसताना बोलून जायचे, हे योग्य नव्हे. मुळात काही कळत नसताना बोलायचे कशाला? ना छत्रपतींनी कधी सांगितले, की रामदास स्वामी आपले गुरू आहेत. ना रामदास स्वामींनी सांगितले, की शिवराय आपले शिष्य आहे.
नुसती भांडणे लावायची. एकाचे शौर्य, तर दुसऱयाची विद्वत्ता कमी करायची, असाच हा प्रकार आहे. रामदास स्वामींनी जे लिहलेय, ते माझ्या घरात लावलेय. आज काढा परत. ‘निश्चयाचा मेहामेरू…’माझ्या माहितीत इतके कुणी चांगले लिहिलेले नाही. महापुरुषांच्या नावाने माथी भडकवायची. तुमची डोकी फिरवून मते मिळवायची, एवढेच उद्योग सुरू आहेत. राज्यपाल महात्मा फुलेंवरही बोलले. तेव्हा लहानपणी लग्न व्हायची. तुमचे अजून झाले नाही. नको तिथे कसलीही विधाने करायची यांना सवय आहे. काही कळत नाही, असे टीकास्त्र त्यांनी राज्यपालांवर सोडले.
निवडणुका घ्यायच्या नव्हत्या
निवडणुका लांबणीवर पडणार, हे मी आधीच सांगितले होते. आता दिवाळीनंतरच होतील, असे दिसते. निवडणूक आली, की चढायला लागते. तसे वातावरणात यायला लागते. मला ते दिसेना. निवडणुकांसाठी ओबीसी समाजाचे कारण पुढे केले जात आहे. पण, हे सगळे खोटे आहे. मुळात यांना त्या घ्यायच्याच नव्हत्या. मला कुणाच्या आरोग्याबाबत बोलायचे नाही. मला मान्य आहे, त्यांची तब्येत ठीक नाही. पण, निवडणुका पुढे जाण्याचे हेच खरे कारण आहे. प्रशासक नेमला, की झाले. सरकार पण आपले नि मनपा प्रशासक पण आमच्या हातात. सगळेच आम्ही बघणार, असे सारे आहे. लोकांनाही निवडणुकांशी काही देणेघेणे नाही, असे ते म्हणाले,
राज्यात काय चाललेय कळत नाही
राज्यात काय चाललेय कळत नाही. सत्ताधारी व विरोधक दोघेही परस्परांवर संपवायला निघाल्याचा आरोप करत आहेत. मग उरले कोण. आम्हीच ना. लोकांना या साऱयाचा वीट आला आहे. मी आजवर असे सत्ताधारी व विरोधक पाहिले नाहीत. चॅनेलवर शिव्या देतात. ही कसली भाषा? येणाऱया पिढय़ा काय पहातयात? हे विधानसभेत बोलत असतील, तर खाली पंचायतीत काय चालू असेल, याचा विचार करा. संजय राऊत कितीही बोलतात. तिकडूनही तसेच. जनतेच्या प्रश्नांशी यांना काही देणेघेणे आहे, असे फटकारत कार्यालय न उघडता लोक आमच्याशी संपर्क करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यापुढे जोरदार वाटचाल करू
शिवाजी नावाच्या विचारांच्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी की तिथीने, असा प्रश्न करण्यात येतो. 365 दिवस करा. शिवजयंती हा मराठी माणसाचा सण आहे. मनसैनिकांनी तिथीने साजरा करावी. धूमधडाक्यात साजरा करावी. तसेच गुढीपाडव्याला शिवतीर्थावर यावे, असे आवाहन त्यांनी केले. चढउतार हे येतातच. पण, या काळातही मनसैनिक पक्षासोबत राहिले. 16 वर्षे झाली. यापुढेही पक्षाची जोरदार वाटचाल करू, असा निर्धार व्यक्त करत कोरोनाची शांतता भीतिदायक पण चांगली होती. मोदींना सांगावेसे वाटते, महिन्यातून एकदा लॉकडाऊन ठेवावा, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App