विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात भाजपचे किरीट सोमय्या बुधवारी येणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे स्वीय सहाय्यक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची माहिती घेण्यासाठी सोमय्या बारामतीत येणार आहेत.kirit Somaiya in Baramati
सोमय्या बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहूल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाळा भेगडे हे त्यांच्यासोबत असणार आहेत.
शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सोमय्या कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यामुळे सोमय्यांच्या बारामती दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु हा राजकीय दौरा नसून खरमाटे यांच्याशी संबंधित मालमत्तेची माहीती घेण्यासाठी सोमय्या बारामतीत येत आहेत. खरमाटेंच्या संपत्तीच्या चौकशीसाठी सोमय्या यांनी नुकताच सांगलीचा दौरा केला. सांगलीजवळ वंजारवाडी येथील खरमाटे यांच्या फार्म हाऊससमोर त्यांनी सेल्फी घेतला होता. खरमाटे यांच्या मालकीची बारामती एमआयडीसी लगत जमीन आहे. त्या संदर्भात माहिती घेणार आहेत. बारामती तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ते मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घेणार असल्याचे मोटे यांनी स्पष्ट केले. बारामतीत सोमय्या हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात, याकडेही लक्ष लागले आहे. अनिल परब व बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेले आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या-
भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या बारामती भेटीबद्दल माध्यमांनी विचारलं असता, मिश्किल हास्य करत सुप्रिया सुळे यांनी ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे सोमय्या यांचं बारामतीला येणं काही नवीन नाही’, असं उत्तर दिलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App