केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, “चहापेक्षा किटली गरम” म्हणजे मंत्र्यापेक्षा मंत्र्याची बायको, मंत्र्याचा मेव्हणा आणि मंत्र्याचा पीए हेच जास्त रुबाब झाडतात, असा गडकरींच्या म्हणण्याचा आशय आहे…!! पण गडकरींची ही म्हण फक्त काही मंत्र्यांनाच लागू होते असे नाही, तर ते आज महाराष्ट्र दिनी होणाऱ्या राजसभेला जास्त लागू होताना दिसते आहे…!! Kettle hotter than tea; The discussion of the meeting is hotter than the Raj speech
राज ठाकरे प्रत्यक्ष संभाजी नगरच्या सभेत नेमके काय भाषण करणार यापेक्षा त्यांच्या सभेची चर्चा महाराष्ट्रभर गरमागरम होत उतू चालली आहे…!! बाकीच्या बातम्यांचे विषय तोंडी लावण्यापुरते उरले आहेत.
राज ठाकरे आज शाल कशी पांघरणार?? तिच्या भगव्या रंगाची शेड डार्क असणार की लाईट असणार?? मनसैनिक त्यांना तलवार भेट देणार की नाहीत?? ती तलवार म्यानातून काढून उंचावतील का?? राज ठाकरे भाषणात कोणते नवे फटाके फोडणार?? कोणाच्या पायात साप सोडणार?? राज ठाकरे यांनी भाषणात काय बोलावे?? काय बोलू नये?? याच विषयांची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.
– पवारांचे “अदखलपात्र”, राष्ट्रवादीचे दखलपात्र
आज महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी कार्यक्रम आहेत. त्यातले काही झालेत, तर काही व्हायचेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. पण चहापेक्षा किटली गरम ही चर्चा मात्र फक्त राज ठाकरे यांच्या सभेबाबत आहे. तसा राज ठाकरे हा विषय महाराष्ट्राला राजकीय दृष्टीने चघळायला जामच आवडतो. शरद पवारांसाठी ते “अदखलपात्र” असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते “दखलपात्र” आहेत हे उघड आहे…!! त्यामुळेच राज ठाकरे यांची सर्वाधिक दखल राष्ट्रवादीचे नेते घेतात. त्यातूनच अजित पवारांनी राज ठाकरे यांनी सभेत काय बोलावे आणि काय बोलू नये??, हे सांगून टाकले आहे. राज ठाकरे यांची सभा म्हणजे करमणूक आहे, हे सुप्रिया सुळे यांनी सांगून टाकले आहे. अशा सुपारी सभा आम्ही शेकड्यांनी बघितल्या, असे सुभाष देसाई म्हणाले आहेत. महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केला तर जनता त्यांना बघून घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
– पैसे देऊन माणसे ते रेकॉर्डब्रेक सभा
खुद्द राज ठाकरे मात्र गेल्या दोन दिवसांत पुणे ते संभाजीनगर व्हाया नगर एवढा प्रवास वगळता काहीही “बोललेले” नाहीत. या प्रवासात त्यांचे ठिकाणी जोरदार स्वागत मात्र झाले. फुले उधळल्याच्या बातम्या आल्या. यातून राज ठाकरे यांना काय “बोलायचे” ते “बोलून” गेले आहेत…!! बाकी सगळी चर्चा ही इतर नेतेच मोठ-मोठ्याने करताना दिसत आहेत. राज ठाकरे हे “भाग्यवान” आहेत. कारण त्यांच्याएवढा विरोधकांनी “प्रचार” केलेला नेता दुसरा कोणताही नाही. विरोधी पक्ष स्वखर्चाने राज ठाकरे यांच्या संभाजीनगरचा सभेचा प्रचार प्रसार करताना दिसत आहेत. 5 – 5 हजार देऊन माणसे आणावी लागताहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणालेत, तर सभा रेकॉर्ड ब्रेकर होणार लाख माणसे येणार असे दावे मनसेपेक्षा प्रसार माध्यमे करत आहेत. सभेची प्रत्यक्ष तयारी जेवढी केली नाही, तेवढ्या सभेच्या तयारीच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.
– लार्जर दॅन अँड बियाँड लाइफ!!
एरवी कोणत्याही नेत्याच्या प्रतिमेला “लार्जर दॅन लाईफ” असे म्हटले जाते. राज ठाकरे यांची प्रतिमा मात्र “लार्जर दॅन अँड बियाँड लाइफ”, अशी झाली आहे. ती त्यांनी स्वतः करण्यापेक्षा त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या स्पॉन्सर असणे आणि त्यामुळेच प्रसार माध्यमांनी करून घेतली आहे. राज ठाकरे नुसता शब्द उच्चारला तरी टीआरपी मिळतो या पलिकडची ही गोष्ट घडली आहे. राज ठाकरे यांना मते किती मिळतील याचे प्रसारमाध्यमांना काही देणेघेणे नाही किंबहुना राज ठाकरे यांना एवढ्या जबरदस्त प्रसिद्धीतून काही मिळवायचे आहे का??, असाच प्रश्न काही माध्यमे विचारताना दिसतात.
– इतरांचेच भोंगे वाजताहेत
पण बाकीचे काही असू देत एक मात्र नक्की राज ठाकरे महाराष्ट्रात बोलले, त्याचे परिणाम उत्तर प्रदेशात दिसेल. योगींनी तब्बल 45000 मशिदींवरचे भोंगे उतरवून दाखवले. महाराष्ट्रात मात्र राज ठाकरे यांच्या सभेचे भोंगे वाजण्यापूर्वी “चहापेक्षा किटली गरम” अशा चर्चेतून इतर नेत्यांचेच भोंगे जोरजोरात वाचताना दिसत आहेत…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App