मयत पत्नी गर्भवती होती अशी धक्कादायक माहितीही समोर. या दाम्पत्याचा खून झाला की आत्महत्या याचा शोध सुरू आहे. Suspected death of a young couple in Beed district in the United States
विशेष प्रतिनिधी
बीड : नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा काल रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय 30) अशी या मयत पती-पत्नीची नावं आहेत. या घटनेने परिसरात आणि अंबाजोगाईमध्ये देखील त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप आहे.
अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटूंबासह राहत होते. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले . त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
भारतीय वेळेनुसार गुरूवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वा . तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटूंबीयांना धक्का बसला. मयत आरती या गर्भवती होत्या अशी देखील माहिती समोर येते आहे. मात्र अद्यापही रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही . शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App