नाशिक : काँग्रेस लवकरच आपल्या नव्या मुख्यालयात म्हणजेच कोटला रोड वरल्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे. 15 जानेवारीला इंदिरा भवनाचे उद्घाटन होत आहे. पण त्यापूर्वीची 47 वर्षे काँग्रेसने 24 अकबर रोड या मुख्यालयात काढली. हे मुख्यालय काँग्रेसचे पतन आणि पुनरुत्थानाच्या इतिहासाचे साक्षीदार बनले. Congress headquarters
इंग्रजांच्या काळात 1911 मध्ये बांधलेला 24 अकबर रोड हा बंगला नेहरूंच्या काळामध्ये म्यानमारच्या राजदूताचे निवासस्थान होते. तिथे नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की म्यानमारच्या राजदूत म्हणून राहिल्या होत्या. पण त्यानंतर काँग्रेसच्या खासदारांना ते निवासस्थान मिळायला लागले. 1978 मध्ये इंदिरा गांधींचे निष्ठावंत खासदार जी. वेंकटेश्वर राव यांच्या नावावर होता. 2 जानेवारी 1978 रोजी इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडून नवी इंदिरा काँग्रेस बनवली, त्यावेळी व्यंकटेश्वर राव यांनी 24 अकबर रोड हा बंगला पक्षाच्या कार्यालयासाठी देऊ केला. तो इंदिरा गांधींनी स्वीकारला. त्यावेळी बंगल्यामध्ये आठ मोठी दालने होती, पण काँग्रेस आपले मुख्यालय बदलताना सध्या 24 अकबर रोड मध्ये 32 दालने आहेत. ती वेगवेगळ्या काँग्रेस अध्यक्षांनी आपापल्या सोयीनुसार बांधून घेतली.
24 अकबर रोड या बंगल्याची इंदिरा काँग्रेसचे मुख्यालय अशी जरी सुरुवात झाली तरी याच मुख्यालयाने इंदिरा काँग्रेस हाच काँग्रेसचा मुख्य प्रवाह झाल्याचे पाहिले. इतर कुठल्याही काँग्रेस या मुख्य प्रवाहापुढे टिकू शकल्या नाहीत हा इतिहास 24 अकबर रोडने अनुभवला. 24 अकबर रोड या बंगल्याने काँग्रेसच्या पतनाचा इतिहास पाहिला, त्याच वेळी पुनरुत्थानाचा इतिहास देखील पाहिला. ज्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडून स्वतंत्र इंदिरा काँग्रेस बनवली, त्यावेळी त्या सत्तेवर नव्हत्या. त्या केवळ चिकमंगळूर पोटनिवडणुकीतून जिंकून लोकसभेवर पुन्हा पोहोचल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधींसाठी एक घोषणा अत्यंत लोकप्रिय ठरली होती, ती म्हणजे “एक शेरनी सौ लंगूर, इंदिरा जितेंगी चिकमंगलूर”!! चिकमंगलूर पोटनिवडणुकीने इंदिरा गांधींच्या राजकीय जीवनाचे पुनरुज्जीवन केले आणि अवघ्या दोन वर्षांमध्ये 1980 साली त्यांनी जबरदस्त कमबॅक करत पुन्हा दिल्लीत सत्ता स्थापन केली, ती पूर्णपणे स्वकर्तृत्वावर होती.
मोरारजी देसाई, जगजीवन राम, चरण सिंग, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी, अटल बिहारी वाजपेयी, राजनारायण, जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये वगैरे दिग्गज नेत्यांचा इंदिरा गांधींनी दणकून पराभव केला होता. वाजपेयी, अडवाणी आणि जॉर्ज फर्नांडिस वगळता बहुतेक सर्व नेत्यांचे राजकारण इंदिरा गांधींनी याच 24 अकबर रोड या काँग्रेसच्या मुख्यालयातून पूर्णपणे संपुष्टात आणले होते.
त्यानंतर 24 अकबर रोडने काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येचा धक्का पचविला. त्याचवेळी काँग्रेसच्या वैभवाचा मोठा काळ पाहिला. राजीव गांधी देखील याच मुख्यालयातून पंतप्रधान पदावर पोहोचले.
राजीव गांधी यांच्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात 24 अकबर रोड याच मुख्यालयाने भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे सरकार पाहिले. नरसिंह रावांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेस पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचा 24 अकबर रोड हा साक्षीदार ठरला होता. त्या काळामध्ये सोनिया गांधींचा काँग्रेस वरचा प्रभाव बऱ्यापैकी घटवून नरसिंह रावांनी काँग्रेसवर आपला प्रभाव निर्माण केला होता. नरसिंह रावांनी गांधींची घराणेशाही रोखून धरली होती.
पण सीताराम केसरी यांना 24 अकबर रोड मधल्या टॉयलेट मध्ये कोंडून सोनिया गांधी समर्थकांनी सोनियाजींचे अध्यक्षपद सुनिश्चित केलेले देखील याच मुख्यालयाने पाहिले.
सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरुवातीची 5 वर्षे विरोधी पक्षात. परंतु, नंतरची 10 वर्षे सत्तारूढ हा काँग्रेसच्या वैभवाचा काळ 24 अकबर रोड या मुख्यालयाने अनुभवला. 24 अकबर रोड कार्यालयाच्या मुख्यालयाचा मागचा दरवाजा 10 जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानालाच जोडून होता.
पण 24 अकबर रोडनेच 2014 चा काँग्रेसचा दारुण पराभव पाहिला. “माँ बेटे की सरकार तो गई”, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणा 24 अकबर रोडलाच ऐकावी लागली. त्यानंतर आजपर्यंत 11 वर्षे उलटून गेली, तरी काँग्रेस सत्तेबाहेर राहिली आहे. पण काँग्रेसला आता नवीन मुख्यालय मिळाले असून ते इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे. 24 अकबर रोड मध्ये काँग्रेसच्या काही घटकांचे कार्यालय यथास्थितीत राहणार असले, तरी आता मुख्यालय मात्र शिफ्ट होणार असल्याने 24 अकबर रोड काँग्रेससाठी “इतिहास” ठरणार आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App