विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता दाभोलकर गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे, असा दावा ‘महा अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. Hamid- Mukta Dabholkar group independent from ‘Mahaannis’Working President Avinash Patil’s claim
एन डी पाटील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न येत नाही, असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. येत्या जून २०२२ मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा कालावधी संपत असून त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील यांनी सर्व प्रसार माध्यमे, कार्यकर्ते व सर्व पुरोगामी संस्था- संघटना, सहकाऱ्यांसाठी पाठविलेल्या निवेदनात दिलेली माहिती अशी : सरोजताई पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. मात्र या गटाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४/६ महिन्यातून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे.
ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच माननीय सरोजताई पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून सदर गटाने निवड जाहीर करणे आहे. समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे.
शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील (संपर्क- +919422790610) यांची, म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते मृत्यु पर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत एन डी पाटील सर हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते.
या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाचे नवे मुखपत्र सुरू केले असून आतापर्यंत त्याचे ५ हजारांहून अधिक वाचक सभासद झालेले आहेत. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैलाताई दाभोलकर यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App